Mithilesh Desai Meets Narendra Modi: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या कन्या रेवती सुळे आणि सारंग लखानी (Revati Sule And Sarang Lakhani Reception) यांच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा काल (10 ऑगस्ट) दिल्लीत पार पडला. या सोहळ्याला नेत्यांसह अनेक दिग्गजांची उपस्थिती लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते या सोहळ्याला उपस्थित होते. या सोहळ्यात शरद पवार आणि नरेंद्र मोदी एकमेकांसोबत गप्पा मारताही पाहायला मिळालं. याचदरम्यान, शरद पवारांनी या कार्यक्रमात रत्नागिरीतील तरुण शेतकरी मिथिलेश देसाई यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटवले. मिथिलेश देसाई यांनी फणस उत्पादन आणि संबंधित कामाबद्दल नरेंद्र मोदींना सविस्तर माहिती दिली. (Mithilesh Desai Meets Narendra Modi)
मिथिलेश देसाई रत्नागिरीचे असून त्यांना ‘जॅकफ्रूट किंग’ म्हणजेच ‘फणस किंग’ म्हणून ओळखले जाते. मिथिलेश देसाई लंडनस्थित सर्क्युलरिटी इनोव्हेशन हबचे भारतातील ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. शरद पवार यांनी मिथिलेश देसाई यांना आपल्या नातीच्या लग्नाच्या रिसेप्शनलाही आमंत्रित केले होते. याच कार्यक्रमादरम्यान मिथिलेश देसाई यांची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींना फणस उत्पादन आणि त्यासंदर्भातील इतर कामांची माहिती दिली.
कोण आहेत मिथिलेश देसाई? (Who Is Mithilesh Desai)
मिथिलेश देसाई हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मिथिलेश देसाई यापूर्वी जर्मनीमध्ये इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. मात्र, मायदेशी परतल्यानंतर त्यांनी फणसाची शास्त्रीय पद्धतीने मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यास सुरुवात केली. आज ते सुमारे 86 प्रकारच्या फणसाची लागवड करतात.
मिथिलेश यांच्या कामाचा शेतकऱ्यांना फायदा- (Jackfruit King Mithilesh Desai)
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा परिसरात मिथिलेश देसाई ‘फणस किंग’ म्हणून प्रसिद्ध आहेत. सुमारे तीन वर्षांपूर्वी त्यांनी सर्क्युलर इकॉनॉमी इकोसिस्टम आणि सर्क्युलर इनोव्हेशन हबला प्रोत्साहन देण्यासाठी लंडनमधील जॅकफ्रूट ऑफ इंडिया या कंपनीसोबत करार केला. या करारामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 1,000 हून अधिक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. या उपक्रमाअंतर्गत कंपनी कोकणातील आंब्याच्या कोयी, फळांची साल, काजू आणि इतर कृषी कचऱ्यापासून विविध उत्पादने तयार करण्यावर काम करत आहे. मिथिलेश देसाई यांच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध झाला आहे. लंडनमधील ही कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीकडून प्रयत्न केले जात आहेत.
