Mira Bhayandar Municipal Corporation: मिरा भाईंदर : काही दिवसांपूर्वी 29 महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर आता महापालिकांवर महापौर निवडण्याची लगबग सुरू आहे. मीरा -भाईंदर महानगरपालिका (Mira Bhayandar Mayor) निवडणुकांनंतर मात्र तिथलं वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. शहरात अमराठी महापौर नको, असा सूर मराठी एकीकरण समितीकडून आळवण्यात आलेला. पण, अखेर भाजप उमेदवार डिंपल मेहता यांचं नाव महापौर म्हणून निश्चित झालं आहे.
मीरा-भाईंदरमध्ये अमराठी महापौर
महापौरपदावरुन शहरातील राजकारणानं वादग्रस्त वळण घेतलेलं. मीरा -भाईंदर महानगरपालिकेवर मराठी महापौर या मुद्द्यावरुन संघर्ष सुरू झालेला. पण मराठी एकीकरण समितीचा विरोध डावलून भाजपनं एकगठ्ठा मतदान केलंय. अर्ज मागे घेण्याच्या वेळेत कुणीही अर्ज मागे घेतला नाही. त्यानंतर डिंपल मेहता यांच्या बाजूनं सर्वाधिक मतदान झालं. भाजपच्या सर्व 78 नगरसेवक आणि 1 अपक्ष मिळून 79 जणांनी हात वर केलेत. त्यामुळे डिंपल मेहताच महापौरपदी विराजमान होणार असल्याचं निश्चित झालं.
मीरा-भाईंदरच्या उपमहापौरपदी कोण?
मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या उपमहापौर पदासाठी भाजपा कडून ध्रुवकिशोर पाटील यांना 79 मतं मिळालीत. त्यामुळे ते उपमहापौरपदी विराजमान होणार आहेत.
मीरा भाईंदरमध्ये कुणाच्या बाजूनं किती मतदान?
काँग्रेसच्या महापौर पदाच्या उमेदवार रुबीना शेख यांच्या बाजूनं मीरा-भाईंदर विकास आघाडीच्या 16 नगरसेवकांनी हात वर केलेत.डिंपल मेहतांना 79 मतं मिळाली तर रुबीना शेख यांना 16 मतं मिळाली, त्यामुळे डिंपल मेहता 79 मतानं महापौरपदी विराजमान झाल्या आहेत.
प्रताप सरनाईकांची मराठी एकीकरण समितीवर टीका
प्रताप सरनाईक यांनी एबीपी माझाशी बोलताना मराठी एकीकरण समितीवर टीका केली आहे, ही समिती आताच कुठून आली, यांनी निवडणुकीत उबाठा आणि मनसेला पाठिंबा देऊन आमचे 28 नगरसेवक पाडले, त्यावेळी आम्हाला पाठिंबा दिला असता तर आता हे आंदोलन करण्याची वेळी आली नसती, असं प्रताप सरनाईक म्हणाले. तसेच, आधी देखील गीता जैन महापौर झाल्या, नरेंद्र मेहता आमदार झाले, तेव्हा आंदोलन का नाही केलं, तिथे 80 टक्के अमराठी समाज आहे, असं प्रताप सरनाईक म्हणाले.
मीरा-भाईंदरमध्ये सुरू असलेला अमराठी महापौरपदाचा गोंधळ नेमका काय?
मीरा-भाईंदर महानगरपालिका (Mira Bhayandar Mayor) निवडणुकांनंतर शहरातील राजकारणाने नवीन आणि वादग्रस्त वळण घेतलं असून, 'मराठी महापौर' या मुद्द्यावर आता संघर्ष सुरू असल्याचं चित्र आहे. भाजपकडून डिंपल मेहता यांनी महापौरपदासाठी (Mira Bhayandar Mayor) नामनिर्देशन अर्ज दाखल केल्यानं, मीरा-भाईंदर महापालिकेला एमएमआरमधील पहिला अमराठी महापौर (Mayor) मिळण्याची शक्यता निर्माण झालेली. या घडामोडींमुळे मराठी समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह (MNS) मराठी एकीकरण समिती आक्रमक झाल्याचं दिसून आलं, त्यानंतर आता मीरा-भाईंदर महापालिकेमध्ये मराठी महापौरच बसावा या मागणीसाठी मराठी एकीकरण समितीकडून आज पुन्हा एकदा मीरा-भाईंदर महापालिकेच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं. भाजपकडून डिंपल मेहता यांनी एकमेव अर्ज भरला असून त्यांच्या बाजून भाजपचं एकगठ्ठा मतदान झालं आहे, त्यामुळे आता मीरा-भाईंदर महापालिकेवर अमराठी महापौर बसणार, हे निश्चित झालं आहे.
