मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रिकरणाबाबत अनेक चर्चा, बैठका झाल्याचे दावे होताना दिसत आहेत. अशातच मुंबई राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये विलीनीकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत काही बैठका झाल्या होत्या. त्यात नेमका कोणता फॉर्म्युला ठरला होता किंवा कोणत्या पर्यायांवर चर्चा झाली? विलीनीकरणानंतर शरद पवार (Sharad Pawar) हे भाजपसोबत सत्तेत गेले असते की अजित पवार सरकारमधून बाहेर पडले असते, असे अनेक प्रश्न आता राजकीय वर्तुळात रंगले आहेत. तर दुसरीकडे अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांनी यावरती भाष्य करणं टाळल्याचं दिसून आलं आहे, त्यानंतर आता अजित पवारांच्या पक्षाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफांनी (Minister Hasan Mushrif) मोठा दावा केला आहे. 'दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणासाठी जयंत पाटील माझ्यासाठी बोलले होते, पण आम्हाला घेऊन कोणत्याही बैठका झाल्या नसल्याचं हसन मुश्रीफांनी (Minister Hasan Mushrif) म्हटलं आहे.

Hasan Mushrif: जे पोटात ते ओठात असं त्यांचं मन होतं

दादा किती मोठे होते, त्यांचा विकासामध्ये किती मोठा वाटा होता, हे सर्वांना माहिती आहे. अजितदादांनंतर आता आम्ही पोरके झाले आहोत. त्यांनी कधी खोटं बोलण्याचा प्रयत्न केला नाही. जे पोटात ते ओठात असं त्यांचं मन होतं. दिलेला शब्द पाळणारा आणि कायमच सर्वांना न्याय देणार आमचा नेता होता. त्यांच्या जाण्यानं आम्ही पोरके झालो आहेत. राज्यासाठी, कार्यकर्त्यांसाठी सुनेत्रा वहिनींनी त्यांचं दु:ख बाजूला ठेवून त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे, असंही मुश्रीफ म्हणालेत.

Hasan Mushrif: दोन्ही पक्षांच्या नेत्यांना घेऊन बैठक झाली नाही

राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबतची जी चर्चा आहे आणि त्याचं मुख्यमंत्र्यांनी देखील खंडन केलं आहे. जयंत पाटील सांगतात अनेक बैठका झाल्या, जयंत पाटलांनी मला देखील थोडं सांगितलं होतं. दादांनी पालिका निवडणुकीत त्याचं विश्लेषण केलेलं होतं. मात्र आम्हाला पक्षाच्या मुख्य नेत्यांना घेऊन आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना घेऊन कोणतीही बैठक झाली नव्हती. आम्ही एडीएमध्ये आहोत,त्यांची संमती होती की नाही, हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. याचा मुख्यमंत्र्यांनीही खंडन केल आहे. यथावकाश सुनेत्रा वहिनी आणि पवार परिवार जे ठरवतील ते होईल. पण जबाबदारी होती की दादांनंतर आपल्या कार्यकर्त्यांना धीर देणं आणि त्यांना आम्ही पाठिशी आहोत हे सांगण गरजेचं होतं, ते काम सुनेत्रा वहिनींनी केलं आहे, तिसऱ्या दिवसानंतर त्यांनी शपथ घेतली, दादांनंतर अनाथ झालेल्यांना पक्षाला त्यांनी साथ दिली आहे. 

Hasan Mushrif: दादांनंतर आता अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले

अजितदादांची दोन्ही राष्ट्रवादी एक व्हावी अशी इच्छा होती का? या प्रश्नावर उत्तर देताना मुश्रीफ म्हणाले, दादांचं जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेमध्ये मी वक्तव्य ऐकलं, पंरतू आम्हा राष्ट्रवादीच्या काही नेतेमंडळींना घेऊन अशा चर्चा कधी झालेल्या नाहीत, असंही मुश्रीफ म्हणाले. अनेक ठिकाणी दादांनी चिन्ह एक केलं, ज्याला तुतारीवर लढायचचं त्यांनी त्यावर लढा आणि ज्यांना घड्याळ चिन्हावर लढायचं त्यावर लढा असं सांगितलं होतं, आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही तसे प्रयत्न केले होते. अनेक ठिकाणी दादांनी सांगितलं तसं लढलो, मात्र दादांनंतर आता अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत, असंही हसन मुश्रीफांनी म्हटलं आहे.