मुंबई : ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण आशा भोसले यांच्या पार्थिवावर सायंकाळी 5 वाजता मुंबईतील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारासाठी मुख्यमंत्र्यांसह राज्यातील दिग्गज नेते उपस्थित होते. जवळजवळ सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे नेते अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत दाखल होते. मात्र, शिवसेना शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा (Milind deora) यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वाद उफाळून आला आहे. मिलिंद देवरा यांनी केलेलं ट्विट हे काँग्रेसला उद्देशून असल्याचं समजून काँग्रेसने त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. शिंदेंचे उपकार फेडण्याचा प्रयत्न करणारा गद्दार मिलिंद देवरा हा राजकारणातील सर्वात खालच्या पातळीचा नमुना ठरतो, अशा शब्दात महाराष्ट्र काँग्रेसने (Congress) देवरा यांच्या ट्विटला प्रत्त्युत्तर दिलंय

Continues below advertisement

आशा भोसले यांच्या अंत्यसंस्कारासाठी आज मुंबईत उपस्थित राहिलो. सर्वच स्तरांतील लोकांनी एकत्र येत प्रेम, संगीत आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करत त्यांना अखेरचा निरोप दिला. प्रत्येक राजकीय पक्षाने या दु:खद प्रसंगी वरिष्ठ प्रतिनिधित्व सुनिश्चित केले होते. मात्र, एक अपवाद ठळकपणे दिसला, जो देशाच्या सांस्कृतिक स्पंदनापासून त्यांचा तुटलेपणा दर्शवतो, असे ट्विट मिलिंद देवरा यांनी केले होते. आता, त्यांच्या या ट्विटला काँग्रेसला उत्तर दिलंय. 

लाचारी, मुर्खपणा आणि अज्ञान यालाही काही सीमा असते म्हणतात, पण मिलिंद देवरांनी ही सीमा कधीच ओलांडली आहे. मिलिंद देवरांच्या वडिलांचे सहकारी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी मंत्री नसीम खान, खासदार प्रणिती शिंदे आणि प्रदेश काँग्रेसचे अनेक जबाबदार पदाधिका-यांनी स्वतः जाऊन आशाताई भोसले यांना श्रद्धांजली वाहिली. ही आपली संस्कृती आहे, परंपरा आहे, आणि माणुसकी आहे. पण दुसरीकडे, शिंदे गटाच्या दारात उभं राहून खासदारकीची भीक मागणारा आणि ती मिळाल्यावर उपकार फेडण्यासाठी खोटे बोलून काँग्रेसवर चिखलफेक करून शिंदेंचे उपकार फेडण्याचा प्रयत्न करणारा गद्दार मिलिंद देवरा हा राजकारणातील सर्वात खालच्या पातळीचा नमुना ठरतो, अशा शब्दात काँग्रेसने ट्विटरवरुन मिलिंद देवरा यांना सुनावलं. 

Continues below advertisement

लाचारीतही एक मर्यादा असते (Congress on deora)

ज्या काँग्रेसने तुमच्या घराण्याला नाव, मान, ओळख आणि सत्तेची दारं उघडून दिली, त्याच काँग्रेसवर उगाचच भुंकत फिरणं ही कृतघ्नतेची परिसीमा नाही तर काय? मिलिंद देवरांनी आधी आरशात स्वतःचा चेहरा पाहावा आणि मग काँग्रेसवर बोलावं. लाचारीतही एक मर्यादा असते, पण ती ओलांडून निर्लज्जपणाचा नवा विक्रम करण्याचं काम सध्या ते प्रामाणिकपणे करत आहेत, असेही काँग्रेसने ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

मिलिंद देवराचं दुसरं ट्विट (Milind deora)

कालचं ट्विट एका पक्षासाठी केलं होतं, पण ते दुसऱ्याच पक्षासाठी आत्मघात, गोंधळ आणि नकळत कबुली देणारं ठरल्याचं पाहून आनंद झाला. “जेव्हा तुमचा शत्रू चूक करत असतो, तेव्हा त्याला कधीही थांबवू नका'', असे नेपोलियन बोनापार्ट यांनी म्हटल्याचा दाखलाही मिलिंद देवरा यांनी दिला. दरम्यान, आपलं ट्विट हे ठाकरेंच्या शिवसेना पक्षासाठी होतं असंच त्यांनी सूचवलं आहे. 

हेही वाचा

मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा