मुंबई : आझाद मैदानात सुरू असलेल्या मराठा (Maratha) आंदोलनाकडे राज्याचे लक्ष लागले असून मराठा आंदोलक शक्तीप्रदर्शन करत आहेत. मात्र, राजकीय नेत्यांच्या गाठीभेटीमुळे आंदोलनावरुन राजकीय टोलेबाजीही पाहायला मिळत आहेत. मनोज जरांगे यांनी केलेल्या टीकेवरा आता मंत्री नितेश राणेंनी पलटवार केला आहे. कोकणच्या विकासासाठी वैभव खेडेकर यांनी भाजप मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे कोकणातील भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यानंतर, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांच्यावरही नाव न घेता टीका केली. सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनावर नितेश राणेंनी (Nitesh Rane) टीका केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी बोचऱ्या शब्दात राणेंवर प्रहार केला होता. नितेश राणेंच्या आवाजाची तुलना चिचुंद्रीशी केल्याचं पाहायला मिळालं. आता, मनोज जरांगे पाटील यांच्या टिकेला नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय.
मराठा आरक्षण आंदोलनाच्या बाबतीत समिती गठित करण्यात आली आहे, त्या समितीत मातब्बर लोक आहेत. त्यामुळे लवकर तोडगा निघेल, असे नितेश राणे यांनी म्हटले. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसं यांनी दिलेलं आरक्षण कोणी घालवलं? असे म्हणत आंदोलनस्थळी भेट देणाऱ्या सुप्रिया सुळेंवरही टीका केली.
आंदोलनाच्या ठिकाणी काही महिला पत्रकारांची छेडछाड झाल्याच्या आरोपावर नितेश राणे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेत असू तर कधीच कुठल्या महिलेकडे वाकड्या नजरेने पाहणार नाहीत. हे लोक कोण आहेत हे शोधणे गरजेचे. आंदोलनाला कोणाचं बळ आहे यासाठी एक पत्रकार परिषद घेऊ. पण, फडणवीस साहेबाचं नाव घेतल्याशिवाय हे पुढे जाऊच शकत नाही,ज्या झाडाला फळे लागतात त्याच झाडावर दगड मारले जातात, असे म्हणत राणेंनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
जरांगेंच्या टीकेला प्रत्त्युतर
पोलिस आंदोलक वेशात जात आहेत, या जरांगे पाटलांच्या वक्तव्यावरही राणेंनी प्रत्युत्तर दिलं. पोलिसांवर एवढा अविश्वास दाखवू नका, सुट्टी रद्द करून ते काम करत आहेत. आता, नितेश राणेंवर ते टीका करणारच, कारण त्यांना कालपासून दाढीवाले भेटत आहेत. अब्बाला खुश करायचं आहे, त्यामुळे ते मला शिव्या देणारच. मी हिंदुत्वाचं काम करतो, त्यामुळे त्यांना खुश करण्यासाठी मला शिव्या देतात, असे म्हणत नितेश राणेंनी मनोज जरांगे यांनी केलेल्या टिकेवर पलटवार केला. तसेच, अबू आझमी आणि एमआयएमचे वारिस पठाण यांनी आंदोलनस्थळी दिलेल्या भेटीवरूनही टोला लगावला. त्यांच्याबरोबर जे आता व्यासपीठावर बसायला येताहेत, ते जिहादी मानसिकतेचे, ते कसं चालतं आता? व्यासपीठावर गोमूत्र शिंपडलं पाहिजे, असेही राणेंनी म्हटले. तर, कोकणात मराठा समाजाला काही प्रॉब्लेम नाही.आम्ही सर्व इथे गुण्या गोविंदाने राहतो, असेही स्पष्ट केले.