जालना : राज्याचे मंत्री छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) मराठा उपसमितीच्या निर्णयावरून नाराजी व्यक्त केल्यानंतर आता त्यावर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या वयात त्यांनी स्वतःचं राजकारण पाहावं, पुतण्याला खासदार कसं करता येतं ते पाहावं. ओबीसींच्या नावावर त्यांनी सगळं खाल्लं, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी टीका केली. वेळ पाहून कधी महाविकास आघाडीमध्ये जातात, कधी महायुतीमध्ये जातात, कधी अजितदादांसोबत जातात. यांनी ओबीसी महमंडळ खाल्लं, महाराष्ट्र सदनही सोडलं नाही, अशी जळजळीत टीका जरांगे यांनी भुजबळांवर केली.
राज्यात ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावं, यासह मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे हे अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत. राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने त्यांच्या मागण्या मान्य केल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी होईपर्यंत उपोषण सोडणार नाही, असा पवित्रा जरांगे यांनी घेतला आहे. त्यावरून छगन भुजबळांनी टीका केल्यानंतर जरांगे यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे.
ओबीसींच्या वाट्याचं सगळं खाल्लं
ओबीसींच्या नावावर छगन भुजबळांनी सगळं खाल्लं असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. ते म्हणाले की, "तुम्ही मराठ्यांच्या लेकरांवर का जळता? ओबीसी महामंडळ खाऊन टाकलं, महाराष्ट्र सदन खाल्लं. आता ओबीसींनी यांना ओळखलं आहे. वेळ पाहून हे महाविकास आघाडीचे कसे होता, महायुतीमध्ये कसे जातात, कधी अजितदादांसोबत जातात, हे सगळे पाहत आहेत. भुजबळांनी जे काही केलं ते आता ओबीसी समाज जाणतोय. त्यांची उतरती कळा लागली आहे. एखाद्यावर जळण्याची वृत्ती कुणाचीही नसावी."
मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाज मोठा आहे. एवढ्या मोठ्या समाजाला फक्त 10 टक्के आरक्षण दिलं आहे. ओबीसींची संख्या ही 60 टक्के आहे हे भुजबळांना कुणी सांगितलं? या दोन दिवसात भुजबळांना काय झालं? म्हातारपणात चांगली भूमिका घेईल वाटलं होतं, पण बळ गेलं तरी पीळ गेला नाही. आता यांना पोळी भाजायची असेल. पुतण्याला खासदार करायचे असेल.आपण यांना आता महत्व देणं कमी करावं.
काय म्हणाले होते छगन भुजबळ?
छगन भुजबळ म्हणाले होते की, "जात पडताळणी समिती ही महत्त्वाची समिती आहे. त्याच्यावर कुणीही दबाव आणता कामा नये. काही प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने नाकारली आहेत. ती दुरुस्त करून देतो असं काही आमदार म्हणाले आहेत. आता माझा त्या आमदाराना सवाल आहे मुंबईत 4 नगरसेवकांचं जात पडळणीत प्रमाणपत्र रद्द ठरलं आहे, त्यामुळे त्यांच नगरसेवक पद गेलं आहे. आता ते देखील तुम्ही दुरुस्त करून देणार आहात का? मराठा समाजाकडून कुणबी प्रमाणपत्र घेताना दाखल्यावर खडाखोडी करण्यात आल्या आहे. आता ते दाखले तुम्ही स्वीकारणर आहात का? जात पडताळणी समितीवर कुणीही दबाव आणू नये.
छगन भुजबळ म्हणाले की, "राज्यातील महायुतीच्या नेत्यांनी लक्षात घ्यावं, ओबीसींनी तुम्हाला मदत केली आहे. तुमचं सरकार आणण्यात ओबीसींचा महत्त्वाचा हातभार आहे. आता मराठा कुणबी मंत्रालय करायचं सुरू आहे? आता हे कसं काय होईल? करायचं असेल तर प्रत्येक जातीसाठी करा. आमचा दाखल्याला विरोध नाही, मात्र ओबीसी आरक्षण संपता कामा नये . मराठा समाजाकडून कधी ओबीसी आरक्षण घेतलं जात आहे, कधी एसईबीसी आरक्षण घेत आहेत, तर कधी EWS आरक्षण घेत आहेत. एकच विद्यार्थी तीन आरक्षणाचा कसा काय फायदा घेईल? हे कसं चालेल सरकारने याबाबत स्पष्टता आणायला हवी."
छगन भुजबळ म्हणाले की, "अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळला 750 कोटी आणि ओबीसी समाजाच्या समितीला केवळ 5 कोटी हे कसं काय चालेल? मी त्यामुळे त्या दिवशी समन्वय समितीच्या बैठकीतून उठून बाहेर आलो. हे अजिबात चालणार नाही. एकीकडे हॉस्टेल तयार झाले आहे, एसी हॉस्टेल आहेत आणि दुसरीकडे अद्याप काहीच नाही? हे अजिबात चालणार नाही."
एकीकडे स्थानिक पातळीवर मराठा आरक्षण उपसमिती निर्णय घेत आहे. जीआर काढत आहे. त्यांना हा अधिकार कोणी दिला? आम्ही देखील इकडे विविध समितीत काम केलं आहे. आता ओबीसी समितीने असं केलं तर चालेल का? समितीचे प्रमुख विखे असं करणार असतील तर मी सुद्धा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला
