मुंबई : मराठा आरक्षणासाठी राजधानी मुंबईत (Mumbai) सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांच्या वागणुकीवरुन आता आरोप प्रत्यारोप होत आहेत. मराठा आंदोलकांकडून मुंबईतील आझाद मैदानात घाण केली जातेय, रस्त्यावरच अंघोळ केली जातेय, रेल्वे स्थानकावरच खेळ खेळले जात आहेत. पोलीस बॅरेकेट्संचा खेळणी म्हणून वापर होतंय, असे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आज मुंबई उच्च न्यायालयातही सरकारच्यावतीने हे निदर्शनास आणून देण्यात आले. विशेष म्हणजे मुंबईतील मराठा आंदोलन हाताबाहेर गेलंय, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. त्यावरुन, राजकीय मतप्रवाह समोर येत आहेत. तर, काही नेत्यांकडून आंदोलकांवर टीकाही केली जात आहे. भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर (Pravin darekar) यांनी आंदोलकांच्या या वर्तणुकीवरुन संताप व्यक्त केला आहे.
आंदोलक किंवा आंदोलन मनोज जरांगे यांच्या हाताबाहेर गेलंय का, असा प्रश्न एबीपी माझाच्या झिरो अवरमधील कार्यक्रमात विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना आमदार प्रवीण दरेकर यांनी आम्हाला हे पाहून लाज वाटते असं म्हटलंय. ज्या पद्धतीने खेळ चालले आहेत, कोण कबड्डी खेळतय, कोण हुतूतू खेळतंय, कोण हौदात उतरुन अंघोळ करतंय, मुंबई ह्या देशाची आर्थिक राजधानी आहे. आम्हीही मराठे आहोत, आम्हाला लाज वाटतेय, ज्या पद्धतीचं लोक सांगतायत, ज्या पद्धतीची घाण पसरतेय, असे म्हणत प्रवीण दरेकर यांनी आंदोलकांच्या व्हायरल व्हिडिओवरुन नाराजी व्यक्त केली. महिलांच्या बाबतीत प्रसंग घडला, सुप्रियाताईंच्या बाबतीत प्रसंग घडला, हा मराठ्यांचा आदर्श आहे का? असा सवालही दरेकर यांनी विचारला. दरम्यान, तुम्ही साप म्हणत म्हणत भुई थोपटणार, देवेंद्रजींना थोपटणार. पण, तुम्हीचा सांगा ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देता येतं का? असा सवालही दरेकरांनी मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे यांना विचारला.
दरम्यान, आंदोलनाला स्थगिती देण्यासंदर्भात दाखल याचिकेवर न्यायालयात आज सुनावणी झाली. यावेळी, हे आंदोलन हाताबेहर गेलंय असे म्हणत राज्य सरकारला कायद्यानुसार कारवाईचे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत.
त्रास झाला तरी अभिमानाने सहन करू
दरम्यान, रोज अमराठी लोकांची गर्दी सहन करतो हा मुंबईकर, आता आपले हक्काचे मराठी भाषिक मुंबईत आले आहेत. त्यात वावगं काय आहे थोडासा त्रास झाला तरी अभिमानाने सहन करु, असे म्हणत मनसेच्या अविनाश जाधव यांनी मराठा आंदोलकांच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. माझे राजसाहेब नेहमीच सांगतात मुंबई मराठी माणसाच्या बापाची आहे, असेही जाधव यांनी म्हटले.
हेही वाचा
जरांगे पाटील भावाला चिचुंद्री म्हणाले; निलेश राणे संतापले, म्हणाले, नितेशवर तुम्ही टीका करा पण...