Manoj Jarange Patil Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी झालेल्या विविध आंदोलनांतील मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. आठ जिल्ह्यांतील 34 व्यक्तींच्या कायदेशीर वारसदारांना प्रत्येकी 10 लाख रुपयांप्रमाणे एकूण 3 कोटी 40 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
मराठा समाजाच्या मागण्यांसाठी राज्यातील विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनांत एकूण 309 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने या मृत व्यक्तींच्या वारसदारांसाठी 27 कोटी 50 लाख रुपये मंजूर केले आहेत. यापैकी 34 व्यक्तींच्या कुटुंबांना मदत मिळणे अद्याप बाकी होते. अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मृतांच्या वारसदारांना दिल्या जाणाऱ्या मदतीचा प्रश्न उपस्थित केला होता. यासंदर्भात जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून उर्वरित वारसांना तातडीने मदत देण्याची ग्वाही दिली होती. त्यानंतर आज राज्य सरकारकडून तातडीने मदत मंजूर करण्यात आली आहे.
3 कोटी 40 लाख रुपयांची मदत तातडीने मंजूर- (Manoj Jarange Patil Maratha Reservation)
राज्य सरकारने मागील दोन दिवसांत केलेल्या कार्यवाहीमुळे विविध जिल्ह्यांतील एकूण 34 मृत व्यक्तींच्या वारसदारांना प्रत्येकी 10 लाख रुपये, याप्रमाणे एकूण 3 कोटी 40 लाख रुपयांची मदत तातडीने मंजूर केली आहे. यामध्ये बीड जिल्हयातील 15, धाराशिव 5, परभणी 4, हिंगोली 4, नांदेड 3, जालना 1, छत्रपती संभाजीनगर 1 आणि लातूर 1 अशा वारसांचा समावेश आहे, अशी माहिती उपसमितीचे अध्यक्ष डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. आंदोलनादरम्यान सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता तातडीने करण्यात येत आहे. उपसमितीच्या बैठकीत सर्वच मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, त्यावर वेगाने कार्यवाही सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते? (Devendra Fadnavis On Manoj Jarange Patil)
मनोज जरांगेंनी आमरण उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांना जी आश्वासन दिली आहेत, ती सर्व तुमच्या समोर (माध्यमांसमोर) दिली. कोणतेही आश्वासन मागे दिलेलं नाही. आम्ही दिलेली आश्वसनं मनोज जरांगे यांनी देखील वाचून दाखवली आहेत. सातत्याने मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका आमच्या सरकारने घेतली आहे, त्यानुसारच कारवाई केलेली आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
