मुंबई : राज्यात सध्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू असून जरांगे पाटलांनी बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे मध्यरात्री 2 वाजता जाहीर सभा घेतली. गेल्या 18 दिवसांपासून जरांगे पाटलांचे उपोषण सुरू असल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. त्याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांना मुंबईकडे न जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. दुसरीकडे जरांगे पाटलांच्या आंदोलनावर काही ओबीसी (OBC) नेत्यांकडून टीकाही केली जात आहे. तर, विरोधकांकडून सरकारला लक्ष्य केलं जातंय. त्यातच, आता ओबीसी नेते तथा काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार (Vijay wadettiwar) यांनी सरकार जरांगे पाटलांना फसवत असल्याचे म्हटले.
मनोज जरांगेंना सरकार वारंवार का फसवते आहे, जरांगे स्वतः का फसतात, ते मोठ्या त्वेषाने मुंबईकडे चाल करून जातात आणि गुलाल उधळत येतात, असे म्हणत विजय वडेट्टीवारांनी आजपर्यंतच्या आंदोलनावरुन हल्लाबोल केला. सरकारची नियत आणि जरांगे पाटलांचे आंदोलन याची समीक्षा होण्याची गरज आहे. ओबीसींचं नुकसान जरांगेंच्या मागण्या पूर्ण करताना होत नाही, असे सरकारला वाटत असेल, तर 12 मागण्या कोणत्या त्या सरकारने जाहीर कराव्या. जरांगेंसोबत ज्या पद्धतीने गाड्यांचा ताफा चालला आहे, त्याचा जोश पाहून कुठल्या लढाईला हे चालले आहे का? असे वाटते. आपण लोकशाहीमध्ये आहोत की राजेशाही मध्ये आहोत, असा प्रश्न पडतो, अशा शब्दात विजय वडेट्टीवारांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनावर आपली भूमिका मांडली.
मनोज जरांगेंच्या मागण्या वारंवार बदलत गेल्या, कुणबी नोंदी असलेल्यांना, कुणबी प्रमाणपत्र देण्याला ओबीसीचा विरोध नाही. मात्र, हे नवनवीन गॅझेट शोधून आणतात. सध्या भावनिक साद घालून भावना भडकावून जे चाललाय, त्या आंदोलनाशी ओबीसींचा काही संबंध नाही. जरांगेंना सांगणं आहे की, सणासुदीच्या काळात लोकांना वेठीस धरू नका, आंदोलन करू नका, असे आवाहनही वडेट्टीवारांनी केले.
सरकार आंदोलन हाताळण्यात अपयशी
मंत्रिमंडळ बैठकीत मनोज जरांगे हिंदूंच्या सणात अडचणी आणतात, अशी भावना मंत्र्यांमध्ये दिसून आली. त्यात सरकारचं अपयश आहे, एवढं मोठं सरकार आहे, का शेपूट घालून बसले आहे? जर आंदोलन असंवैधानिक असेल, तर त्याला हाताळण्याची क्षमता सरकारमध्ये असली पाहिजे, असे म्हणत सरकारच्या भूमिकेवरही वडेट्टीवारांनी टीका केली.
हेही वाचा
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, जागेवरुन उठताही येईना, डॉक्टरांचा गंभीर इशारा, म्हणाले...
