जालना : मुंबईच्या आंदोलानावेळी मराठा आरक्षणाचा सातारा गॅझेटचा जीआर एका महिन्यात काढतो असं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र त्यावर आठ महिने झाले तरी काहीही कारवाई करण्यात आली नाही. मराठा आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेतले गेले नाहीत अशा शब्दात मनोज जरांगे यांनी आपला संताप व्यक्त केला. ज्यांना कुणबी पुरावा सापडला त्यांना व्हॅलिडिटी दिली जात नाही, शिंदे समिती रेकॉर्ड शोधत नाही. देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचं वाटोळं केलं, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी टीका केली. ते जालन्यामध्ये बोलत होते.
मराठा आरक्षणाच्या मागणीवरून पुन्हा एकदा आंदोलनाची चिन्हं स्पष्ट दिसू लागली आहेत. जालन्यात बोलताना मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली.
Maratha Reservation : 'मराठ्यांचं वाटोळं करण्याचं काम फडणवीसांनी केलं'
जरांगे यांनी आरोप केला की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मराठा समाजाला जास्तीत जास्त त्रास देण्याचे काम सुरू आहे. मतं आणि नेते मराठ्यांचे लागतात, पण मराठा समाजातील मुलं मोठी होऊ नयेत, अशी भूमिका दिसते, अशा शब्दांत त्यांनी टीका केली. नेकनूर येथील घटनेचाही उल्लेख करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
Satara Gazette GR Maratha Reservation : 'एका महिन्याचं आश्वासन, आठ महिने उलटले'
मुंबई आंदोलनानंतर हैदराबाद गॅझेटचा जीआर निघाल्यावेळी सरकारचं कौतुक केलं होतं, असं सांगत मनोज जरांगे म्हणाले की, त्यानंतर 108 प्रमाणपत्रांचे वितरण झाले. मात्र सातारा संस्थानाच्या गॅझेटबाबत दिलेलं आश्वासन अजूनही पूर्ण झालेले नाही. आता आम्हीच पाहतो हा जीआर कसा निघत नाही, असा इशारा त्यांनी दिला.
Kunbi Certificate Validity : 'कुणबी प्रमाणपत्र असूनही व्हॅलिडिटी नाही'
कुणबी नोंदी सापडूनही संबंधितांना जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याने अनेक मराठा कुटुंबे अडचणीत असल्याचं जरांगे यांनी सांगितलं. शिंदे समिती रेकॉर्ड शोधण्याच्या प्रक्रियेत अपेक्षित गती नसल्याने समाजात नाराजी वाढत असल्याचे त्यांनी नमूद केलं.
Maratha Protest : आंदोलनाची नवी तारीख जाहीर होणार
मराठा समाज न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नसल्याचं स्पष्ट करत जरांगे यांनी आंदोलनाची पुढील तारीख शनिवारी जाहीर केली जाईल, असं सांगितलं. आमची लेकरंही आम्हाला सोन्यासारखी आहेत. सरकारने आणखी बळी घेऊ नये, असे भावनिक आवाहनही त्यांनी केलं.
ही बातमी वाचा:
