रामदास कदम म्हणाले सुनील तटकरेंनी गलिच्छ राजकारण केलं, मनिषा तुपे प्रत्युत्तर देत म्हणाल्या, राष्ट्रवादीच्या कामकाजात नाक खुपसू नये...
NCP : राष्ट्रवादीच्या मुंबई कार्याध्यक्ष मनिषा तुपे यांनी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निधनानंतर सुनील तटकरे यांनी गलिच्छ राजकारण केलं असल्याची टीका शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रामदास कदम यांनी केली होती. शरद पवार यांना शहा देण्यासाठी सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार वहिनींना शपथ घ्यायला लावली असं रामदास कदम म्हणाले होते. कदम यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई कार्याध्यक्ष मनिषा तुपे यांनी उत्तर दिलं आहे. रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कामकाजात नाक खुपसायचे काही कारण नाही, असं मनिषा तुपे यांनी म्हटलंय.
रामदास कदमांना मनिषा तुपेंचं उत्तर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई कार्याध्यक्ष मनिषा तुपे यांनी रामदास कदम यांना प्रत्युत्तर दिलं आहे. रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कामकाजात नाक खुपसायचे काही कारण नाही. आमचे सर्व नेते, आमदार, कोअर कमिटीने सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय एकत्रितपणे घेतला आहे, असं मनिषा तुपे म्हणाल्या.
अहो बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांना तुम्ही किती त्रास दिलात हे जगजाहीर आहे. खाल्या मिठाला जागणारे तुम्ही नाही तर खाल्या ताटात विष कालावणारे तुम्ही आहात, असं मनिषा तुपेंनी म्हटलं. दादांबदल सांगायचं तर दादांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्या विवाहसोहळ्याला नगरपालिका निवणूकांमुळे दादा उपस्थित न राहता नंतर कुटुंबाला भेटणारे दादा होते. म्हणूनच अवघ्या महाराष्ट्रात कामाचा माणूस म्हणून दादांची ओळख होती, असं मनिषा तुपे यांनी म्हटलं.
याच दादांच्या आदर्शावर पाऊल ठेवत दुःखाची राख सावडून सुनेत्रा वहिनी खंबीर पणे उभ्या राहत असतील तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस परिवार वाहिनींसोबत धीराने उभा आहे. पुन्हा सांगते आमचा पक्ष किंवा आमचे नेते यांच्यावर टीका केली तर याद राखा, असं मनिषा तुपे यांनी म्हटलं.
रामदास कदम काय म्हणाले होते?
अजित पवार गेल्यानंतर सुनील तटकरे यांनी गलिच्छ राजकारण केलं. शरद पवार यांना शह देण्यासाठी सुनील तटकरे यांनी सुनेत्रा वहिनींना शपथ घ्यायला लावली, असं रामदास कदम म्हणाले होते. अजित पवार यांच्या चितेची आग विझण्याआधी वहिनींना शपथ घ्यायला भाग पाडलं.... दहा दिवस गेले असते तर काय झालं असतं?? शरद पवार राष्ट्रवादीचा ताबा घेतील या भीतीने वहिनींना शपथ घ्यायला भाग पाडलं. सुनील तटकरेंनी केलेली ही कृती निंदनीय आहे, महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही, असं रामदास कदम यांनी म्हटलं होतं.
सुनील तटकरे विश्वासघातकी आहेत, ज्यांनी ज्यांनी त्यांना मोठं केलं त्यांना संपवण्याचे काम त्यांनी केलं. लोकसभेत त्यांना मी निवडून आणले मात्र योगेश कदम यांना पडण्यासाठी प्रयत्न केले, असं रामदास कदम म्हणाले होते.

























