Manikrao Kokate : बारामतीत विमान अपघातात अजित पवार (Ajit Pawar) यांचे बुधवारी निधन झाले. त्यानंतर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी शनिवारी सायंकाळी शपथ घेतली. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. गेल्या तीन दिवसापासून माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ व माजी मंत्री धनंजय मुंडे बैठकांवर बैठका घेत आहेत. त्यातच सीएम देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. त्यामुळे या सर्व प्रकारामुळे एकीकडे नाराजी व्यक्त केली जात होती. तर प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, असा दावा पियुष गोयल यांनी केलाय. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
माणिकराव कोकाटे म्हणाले की, आम्ही संपूर्ण अस्थीकलश मुंबईत आणले. प्रत्येक जिल्ह्यात हे अस्थीकलश नेण्यात येणार आहे. नंतर विधिवत त्याचे पूजन करण्यात येईल. काही ठिकाणी शोकसभा देखील घेत आहोत. ३६ च्या ३६ जिल्ह्यात हे कलश नेण्यात येतील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
माणिकराव कोकाटे पुढे म्हणाले की, मला एक समजत नाही की, विलिनीकरणाबाबत का चर्चा करत आहेत. हा प्रश्न कौटुंबिक आहे. त्यात काय चर्चा झाली, याबाबत आम्हाला माहीत नाही. आम्हाला माहिती मिळत नाही, तोपर्यंत आम्ही काही बोलणार नाही. जी चर्चा आहे ती वहिनींसोबत अजितदादांनी केली असेल. आम्हाला काही माहीत नाही. सगळे वहिनींसोबत चर्चा करतील आणि त्या जो निर्णय घेतील, तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल, असे देखील माणिकराव कोकाटे म्हणाले.
Manikrao Kokate on Sunetra Pawar: फक्त सुनेत्रा पवारच राष्ट्रीय अध्यक्ष होतील : माणिकराव कोकाटे
वाहिनींसोबत दादांची चर्चा झाली असेल. आम्ही कोणी सहभागी नव्हतो. त्यामुळे मी काही भाष्य करू शकत नाही. वहिनी पक्षाच्या नेत्या आहेत, त्या निर्णय घेतील. फक्त सुनेत्राताई पवारच राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहेत. बाकी कोणी होणार नाही. सह्या करो किंवा न करो, आमची चर्चा झाली आहे. उत्तराधिकारी सुनेत्रा वहिनीच असतील आणि सगळ्या महत्वाच्या पदावर वाहिनीच असतील, असे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.
Sunil Shelke: त्यांना आमचा अध्यक्ष ठरवण्याचा अधिकार नाही : सुनील शेळके
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, दिवंगत अजित पवारांच्या अस्थी आज पक्ष कार्यालयात आणण्यात आल्या असून, ज्यांना शेवटचे दर्शन घेता आले नाही अशा कार्यकर्त्यांसाठी अस्थी सर्व जिल्ह्यांमध्ये नेण्यात येणार आहेत. अजित पवारांच्या अकाली निधनानंतर पक्षाची सर्व जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर सोपवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असून, पक्षाचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार त्यांच्याकडेच आहेत, असे शेळके यांनी स्पष्ट केले. विलिनीकरण आणि नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर त्यांनी नाराजी व्यक्त करत, “दादा जाऊन अवघे पाच दिवस झाले आहेत. थोडा वेळ जाऊ द्या. एवढी घाई कशाला?” असा सवाल उपस्थित केला. तसेच, “आमच्या पक्षात नसलेल्यांना आमचा अध्यक्ष कोण हे ठरवण्याचा अधिकार नाही,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
आणखी वाचा
