Manikrao Kokate: विधिमंडळाचं कामकाज सुरु असताना ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल (Manikrao Kokate On Playing Rummy Video) झाल्यामुळे वादात सापडलेले राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) हे आपल्या पदाचा राजीनामा देतील, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, ही चर्चा फोल ठरली आहे. कारण माणिकराव कोकाटे यांनी आज (22 जुलै) नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी माणिकराव कोकाटे यांनी राजीनाम्याच्या घोषणेऐवजी कृषी विभागाच्या एका नव्या योजनेची घोषणा केली. माणिकराव कोकाटे यांनी कृषी समृद्धी या नव्या योजनेचे लाँचिंग करत असल्याचे जाहीर केले. शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाच हजार कोटींची भांडवली गुंतवणूक करण्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती. मात्र, त्याचा जीआर निघणे बाकी होते, तो आज निघाला, असे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. यानंतर माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चेसंदर्भात भाष्य केले. यावेळी त्यांनी आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला.

Continues below advertisement

मी खरं म्हणजे हा इतका छोटा विषय आहे, तो इतका लांबला का ते माहिती नाही. ऑनलाईन रमी हा प्रकार तुम्हाला माहिती नाही का, तो खेळण्यासाठी त्याला मोबाईल नंबर आणि बँक  अकाऊंट जोडावा लागतो. माझा असा कोणताही मोबाईल नंबर आणि बँक अकाऊंट ऑनलाईन रमीच्या अॅप्लिकेशनला जोडलेला नाही. कुठेही चौकशी करा, ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरु झाली आहे, तेव्हापासून मी एक रुपयाची रमी खेळलेली नाही. किंबहुना मला रमी खेळताच येत नाही. त्यामुळे माझ्यावरील आरोप बिनबुडाचा आहे. यामुळे माझी महाराष्ट्रात बदनामी झाली आहे. कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे, ज्या राजकीय नेत्यांनी आरोप केला आहे, ज्यांनी माझी बदनामी केली आहे, त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय मी राहणार नाही, असा इशारा माणिकराव कोकाटे यांनी दिला.

त्या क्षणाला न थांबता माझा राजीनामा देईन- माणिकराव कोकाटे

मी त्यादिवशी सभागृहात होतो, माझं काम होतं. मला माझ्या ओएसडीकडून माहिती हवी असेल तर मला एसएमएस किंवा फोन करावा लागतो. त्यांना सभागृहात आत येत नाही. त्यासाठी मी एक मोबाईल मागवला होता. मोबाईल उघडल्यावर त्याच्यावर तो गेम आला, त्या गेमचा सारखा पॉप-अप येतो. तो मला स्कीप करता आला नाही. तो मोबाईल माझ्यासाठी नवीन होता म्हणून मला गेम स्कीप करायला वेळ लागला. पण मी गेम स्कीप केल्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच नाही, तो तुम्ही दाखवलाच नाही. मोबाईलवर एकच गेम येत नाही, वेगवेगळे गेम येतात. 30 सेकंद गेम स्कीप करता येत नाही. माझा व्हिडिओ 11 सेकंदांचा आहे. त्यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. पूर्ण व्हिडीओ दाखवला असता तर माझ्यावरील आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, हे स्पष्ट झाले असते. मी आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती आणि विधानसभा अध्यक्षांना लेखी पत्र देणार आहे, याप्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे तुम्ही चौकशी करावी. मी ऑनलाईन रमी खेळत असेन, मी दोषी सापडलो तर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणीही निवेदन करावं, त्या क्षणाला न थांबता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला न भेटता मी राज्यपालांकडे जाऊन माझा राजीनामा देईन, असे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

Continues below advertisement

सदर प्रकरणी सीडीआर चौकशी करा- माणिकराव कोकाटे

माणिकराव कोकाटे पुढे म्हणाले की, तो व्हिडिओ कोणी काढला त्याच्या खोलात मला जायचं नाही. परंतु, त्यामध्ये एवढं विशेष काही नव्हतं की, ज्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या भावना दुखावतील किंवा छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना दुखावतील. मी काहीही वेडवाकडं केलेलं नाही. मी आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी इतके निर्णय घेतले, त्यासंदर्भात आतापर्यंत कोणीही काहीच बोलंल नाही. फक्त ज्याचा शेतकऱ्यांशी संपर्क नाही, अशा गोष्टी फक्त मीडियात दाखवल्या गेल्या. दोषी असलेल्या सर्वांचे सीडीआर चेक करायचे, या सर्वांच्या पाठीमागचा सूत्रधार कोण, हे शोधण्यासाठी चौकशी करावी, अशी मागणी माणिकराव कोकाटे यांनी केले.

मी राजीनामा देण्यासारखं घडलं काय?

मी राजीनामा देण्यासारखं घडलं काय? मी काय कोणाचा विनयभंग केला आहे, मी चोरी केलेली आहे का माझी पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे?, असं झालंय काय? एक फोटो फक्त त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय विरोधकांनी, मी त्यांना कोर्टात खेचणार आहे, अब्रुनुकसानीचा दावा पण दाखल करणार आहे. मीडियावाल्यांनी एकदा काही टाकलं की, लगेच खाली प्रतिक्रिया येतात. आता माझा पाय तिरपा पडला तर लगेच मिडिया म्हणेल, कृषीमंत्र्यांचा पाय तिरपा पडला. अरे पाय तिरपा कशामुळे पडला? मग खाली प्रतिक्रिया येतात की, 'हा दारु प्यायला असेल', 'हा गांजा प्यायला असेल', 'त्या बाजूला बाई दिसत आहे, तिच्याकडे बघत असेल', असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटले.

नेमकं प्रकरण काय?

नुकतंच पार पडलेलं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आमदार आणि मंत्र्यांच्या कारनाम्यांमुळे चांगलच गाजलं. अधिवेशन संपलं पण नेतेमंडळींचे कारनामे काही संपत नाहीय. आमदार संजय गायकवाड, मंत्री संजय शिरसाट, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड, भाजपचे  पडळकर यांच्यानंतर कृषिमंत्र्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात चक्क ऑनलाईन जुगार खेळतायत असा दावा करत आमदार रोहित पवारांनी हा व्हिडीओ ट्विट केला आणि त्यानंतर राज्यातल्या राजकारणात एक नवा वाद सुरु झाला. 

संबंधित बातमी:

Devendra Fadnavis : कोकाटेंचं चुकलंच, त्यांनी काहीही सांगितलं तरी ते आमच्यासाठी भूषणावह नाही, रमी प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया