Manikrao Kokate : कृषीमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच आहे आणि मला हे खाते दिले आहे, असे विधान राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. यानंतर शेतकऱ्यांकडून माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला होता. आता शुक्रवारी (दि. 04) नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (NDCC Bank) विशेष सर्वसाधारण सभेत देखील माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या विधानाचे पडसाद उमटले. शेतकऱ्यांकडून माणिकराव कोकाटे यांच्या विधानाची आठवण करून देण्यात आली. यानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि शेतकऱ्यांमध्ये काही बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची विशेष सर्वसाधारण सभा आज पार पडली. या सभेत ठेवीदार शेतकरी आणि बँकेचे प्रशासक समोरासमोर आले. सभा सुरू होताच शेतकरी प्रतिनिधी आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रतिनिधींच्या बेकादेशीर निवडीबाबत शेतकरी प्रतिनिधी चांगलेच आक्रमक झाले होते. या सभेला कृषीमंत्री माणिकराव कोकाटे उपस्थित होते. त्यांच्यासमोरच विकास शेतकरी संघटनेचे सदस्य आणि इतर शेतकरी सभासदांनी रोष व्यक्त केला. शेतकऱ्यांनी थेट विचारले की, माणिकराव कोकाटे साहेब निवडणुकीत कर्जमाफीची घोषणा केली होती. त्याचे काय झाले? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कर्जमाफी जाहीर केली होती. पण निवडणुका झाल्यानंतर शेतकरी अजूनही आशेवर जगतो आहे," असे म्हणत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
बँकेतील गैरव्यवहारावर संताप
शेतकऱ्यांनी आरोप केला की, "जिल्हा बँकेतील काही कर्मचाऱ्यांच्या फसवणुकीमुळे बँक अडचणीत आली आहे. नोटबंदी काळात 10 टक्के कमिशन घेऊन नोटा बदलून देण्यात आल्या. या कर्मचाऱ्यांवर कारवाई केव्हा होणार?" मोठे थकबाकीदार आहे, त्यांची वसुली केव्हा होणार? संचालक मंडळ आणि जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांना चाप कधी बसणार? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
कर्जमाफीचा ठराव करण्याची मागणी
शेतकरी संघटनांनी ठामपणे सांगितले की, सरकारने कर्जमाफी जाहीर केली आहे, त्यामुळे कोणताही शेतकरी कर्ज फेडत नाही. "म्हणून कृषीमंत्री कोकाटे यांनी या सभेतच ठराव करावा की, कर्जमाफी दिल्यास शेतकरी कर्ज फेडायला तयार होतील."
कर्ज वसुलीसाठी सामोपचार योजना; सभासदांचा विरोध
जिल्हा बँकेने शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीसाठी सामोपचार योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सभासदांनी या योजनेला कडाडून विरोध केला. शेतकऱ्यांनी यावर आक्रमक भूमिका घेत कोकाटेंना घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी सभागृहात वातावरण तणावपूर्ण झाले. यावेळी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शांततेचे आवाहन केले. "सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. अडचणी दूर करण्यासाठी योजना राबवण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढेही प्रयत्न सुरू राहतील," असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले.
‘ओसाड गावाची पाटीलकी’ विधानावरून बाचाबाची
या सभेत शेतकऱ्यांनी मंत्री कोकाटेंना त्यांच्या ‘ओसाड गावाची पाटीलकी’ या जुन्या विधानाची आठवण करून दिली. यावरून काही काळ शेतकरी व मंत्र्यांमध्ये बाचाबाचीही झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर सामोपचार कर्ज वसुली योजना जिल्हा बँकेने सर्वानुमते मंजूर केली. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंजुरीची घोषणा केली.
आणखी वाचा