पुणे : राज्याचं लक्ष लागलेल्या पुणे (Pune) शिक्षक मतदारसंघातून महायुतीमधील शिवसेनेच्या मंगेश चिवटे आणि राष्ट्रवादीच्या प्रताप माने यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे, येथे भाजप उमेदवार कौस्तुभ गावडे हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून निश्चित झाले आहेत. मंगेश चिवटे यांनी गेल्या 2 वर्षांपासून शिक्षक मतदारसंघासाठी तयारी सुरू केली होती. मात्र, ऐनवेळी वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांना माघार घ्यावी लागल्याने अनेकांची निराशा झाली आहे. यासंदर्भात आता मंत्री उदय सामंत (Uday samant) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कारण, उदय सामंत हे त्यांचा अर्ज भरतेवेळी त्यांच्यासमवेत होते.
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजप महायुतीच्या कौस्तुक गावडेंना महाविकास आघाडीतील काँग्रेस उमेदवार जयंत आसगावकर हे उमेदवार आहेत. याशिवाय, माजी आमदार दत्तात्रय सावंत, तर मंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहायक सचिन सानप यांच्यासह अनेक उमेदवारांचे आव्हान भाजप महायुतीला आहे. मात्र, मंगेश चिवटे यांनी शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी मागे घेतली, असून मी लहान कार्यकर्ता आहे. याबाबत, पक्षाचे वरिष्ठ नेते बोलतील असे त्यांनी म्हटले होते. आता, या उमेदवारीबाबत मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केलं आहे. उदय सामंत शिर्डीत साईंच्या दर्शनाला आले होते, यावेळी राज्यातील दुष्काळाच सावट लवकरात लवकर दूर व्हावं, अशी प्रार्थना त्यांनी साईंच्या चरणी केली.
मंगेश चिवटे यांची मी मुलाखत बघितली, त्यांनी अस म्हणलय की, निवडणुकीतून अर्ज मागे घेतला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते जे ठरवतील ती रणनीती भविष्यात राहील. तिकीट वाटपात काय झालं, काय नाही झालं? यापेक्षा शिवसेनेच्या जागा आम्हाला जिंकायच्या आहेत, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी मंगेश चिवटेंच्या पुणे शिक्षक मतदारसंघातून माघार घेण्यासंदर्भाने दिली. अमरावतीची जागा आम्ही महायुतीमध्ये लढतोय, शिक्षकाच्या ज्या जागा आहेत, पाठीमागे-पुढे झालं आहे, ते बघू काय करायचं ते, असेही सामंत यांनी म्हटलं.
मंगेश चिवटे काय म्हणाले
मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर माध्यमांनी त्यांना यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावर, पक्षाचे वरिष्ठ नेते यावर भाष्य करतील, मी लहान कार्यकर्ता आहे अशी प्रतिक्रिया मंगेश चिवटे यांनी दिली. त्यामुळे, शिवसेना पक्षाचे अधिकृत प्रवक्ते किंवा उपमुख्यमंत्री तथा मुख्य नेते एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अमरावतीत प्रहारची माघार, बच्चू कडूंची प्रतिक्रिया
अमरावती शिक्षक मतदारसंघातून प्रहारच्या नितीन आगे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. त्यासंर्भात प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. नितीन आगे यांच्यासोबत माझी चर्चा झाली होती, शिक्षकांचे काही प्रश्न होते त्याबाबत देखील दादा भुसे यांनी बैठक घेण्याचं मान्य केलं होतं. आमचं राजकीय जीवन हे शिवसेना आहे, शिंदे साहेबांसोबत बांधिलकी आहे आणि आम्ही तिथे प्रामाणिक आहोत. त्यामुळे फॉर्म वापस घेण्यात आला, असे बच्चू कडू यांनी म्हटलं. तसेच, बंडखोरी जे कोणी करत असतील, त्यावर ते पक्ष निर्णय घेईल, सरनाईक 100% निवडून येतील, ते सर आहेत आणि नाईक पण आहेत, असेही कडू यांनी आपल्या स्टाईलने म्हटले.
