नवी दिल्ली : राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक महिन्यांपासून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दिल्लीच्या राजकारणात जाणार असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्ली दौऱ्यावरती गेले होते, त्यानंतर देखील राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात होते. त्यावेळी देखील फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना दिल्लीच्या राजकारणात जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. त्यानंतर आज (गुरूवारी, ता 3) देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाच्या 'माझा इन्फ्रा व्हिजन' कार्यक्रमात बोलताना पुन्हा एकदा दिल्लीच्या राजकारणात जाण्याबाबतच्या चर्चांवर उत्तर दिलं आहे, माझा पक्ष ठरवेल, माझे नेते ठरवतील, त्या दिवशी मी नक्की दिल्लीला जाईन पण आज तरी माझं मत आहे 2029 पर्यंत मी दिल्लीत नाही, अशी ठाम प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी बोलताना दिली आहे. (Majha Infra Vision CM Devendra Fadnavis)
Devendra Fadnavis : २०२९ पर्यंत मी दिल्लीला नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला असं वाटतं की खूप लोकांना वेगवेगळ्या पध्दतीने वाटतं, त्यात माझे काही हितचिंतक आहेत, त्यांना वाटतं जर दिल्लीला गेलं तर माझं प्रमोशन होईल असं काहींना वाटतं. काही लोकांना असं वाटतं दिल्लीला गेले तर बला टळेल, आपल्या डोक्यावर राहणार नाही, असंही समजणारे लोक आहेत. कोणाला चांगलं वाटो किंवा कोणाला वाईट वाटो, २०२९ पर्यंत माझे नेते मला महाराष्ट्रातच ठेवतील, मी तुम्हाला आजच सांगतो, माझे नेते मला महाराष्ट्रातच ठेवतील, मला राजकारण कळतं, माझा पक्ष कळतो, त्यामुळे दर दोन ते तीन महिन्यांनी कधी कोणाला न्यूज मिळाली नाही तर ते मला दिल्लीला पाठवतात, कधी कोणाला न्यूज क्रिएट करायची असेल तरी मला दिल्लीला पाठवतात, मला त्याचा आनंदच आहे, माझा पक्ष ठरवेल, माझे नेते ठरवतील, त्या दिवशी जरूर मी दिल्लीला जाईन पण आज तरी माझं मत आहे २०२९ पर्यंत मी दिल्लीला नाही, असंही पुढे फडणवीसांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीसांनी 'माझा इन्फ्रा व्हिजन'मध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
महाराष्ट्र राज्य 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण करण्याच्या अगदी उंबरठ्यावर असून, सध्याचा 8.8 टक्के विकासदर चांगला असला तरी राज्याला 10 टक्क्यांहून अधिक विकासदराचा टप्पा ओलांडायचा आहे, असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र हे पहिलेच राज्य असेल जे 1 ट्रिलियन इकोनॉमीचे स्वप्न पाहत आहे, ते पूर्ण व्हावे ही सर्वांचीच इच्छा आहे. मात्र आजचा आपला ग्रोथ रेट 8.8 टक्क्यांवर आहे. 2030 सालापर्यंत 1 ट्रिलियन इकोनॉमी होण्यासाठी हा ग्रोथ रेट वाढायला हवा का, याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अनेक राज्ये 1 ट्रिलियन डॉलर इकोनॉमी होण्याचे स्वप्न बघत आहेत. पण आज त्या स्वप्नाच्या जवळ कोण असेल, तर केवळ महाराष्ट्र आहे, कारण आपण 660 बिलियनवर पोहोचलो आहोत. आपण ट्रिलियनच्या खूप जवळ आहोत. आपण शाश्वत विकास दर (Sustained Growth Rate) ठेवला, तर निश्चितपणे 2030 मध्ये आपण 1 ट्रिलियन डॉलर इकोनॉमी बनवू, असे त्यांनी म्हटले
