Mahebub Shaikh Vs Umesh Patil over NCP ownership: "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांनी स्थापन केली म्हणून ती त्यांचीच मालमत्ता नाही, संस्थापकत्व हा इतिहास आहे, मालकी हक्क नाही" या अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांच्या पोस्टला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते मेहबूब शेख (Mahebub Shaikh) यांनी जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.  उमेश पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये काँग्रेस, भाजप, सपा, DMK, AIADMK, TDP ची उदाहरणे देत म्हटलं होतं की, या पक्षांचे संस्थापक वेगळे आणि आजचे अध्यक्ष वेगळे आहेत, त्यामुळे राजकीय पक्ष हा कोणाच्याही तहयात मालकीचा नसतो. Founder is history, Leadership is organisation, Legal recognition is law अशी भूमिका त्यांनी मांडली होती. त्यावर मेहबूब शेख यांनी पोस्ट करत म्हटलंय की, "संस्थापकत्व हा इतिहास आहे, मालकीहक्क नाही" हे सांगताना इतिहासाचा सोयीस्कर भाग विसरून चालणार नाही.

Continues below advertisement

Mahebub Shaikh: मेहबूब शेख नेमकं काय म्हणाले?

१. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांनी 25 वर्षांपूर्वी स्वतःच्या कष्टाने स्थापन केला, हे कुणाच्याही राजकीय सोयीसाठी बदलता येणार नाही.

२. शरद पवार साहेबांनी कधीही राष्ट्रवादीला आपली "खासगी मालमत्ता" म्हटलेले नाही. पण पक्षाची स्थापना करणाऱ्या व्यक्तीलाच पक्षातून बेदखल करण्याचा नैतिक अधिकार कुणाला आहे?

Continues below advertisement

३. काँग्रेस, भाजप, DMK ची उदाहरणे देणे सोपे आहे, पण त्या पक्षांमध्ये संस्थापकांनाच त्यांनी उभ्या केलेल्या पक्षापासून हुसकावून लावून, सत्तेच्या जोरावर पक्ष बळकावण्याचा प्रकार घडला का?

४. दिल्ली येथील राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय एकच होता - साहेब हेच राष्ट्रीय अध्यक्ष असतील. पुढे सत्तेच्या लालसेपोटी बंड करून संविधानाचा अपमान करत पक्ष बळकावला गेला. सुप्रीम कोर्टात हा विषय आजही न्यायप्रविष्ट आहे.

५. पक्ष लोकांचा, कार्यकर्त्यांचा असतो हे मान्य, पण ज्यांनी तो पक्ष उभा केला त्यांच्या विचारांवरच राजकारण करायचे आणि त्यांनाच बेदखल करायचे ही कोणती नैतिकता?

नाव बदलता येईल, चिन्ह बदलता येईल, पदे बदलता येतील; पण 25 वर्षांचा इतिहास आणि शरद पवार साहेबांचे योगदान मिटवता येणार नाही. आज खरी गंमत अशी आहे की, "पक्ष कोणाच्या मालकीचा नाही" असे सांगणारेच पक्षाच्या संस्थापकाकडून पक्ष हिरावून घेतल्याच्या अन्यायाचे समर्थन करण्यासाठी लोकशाहीची भाषा वापरत आहेत. लोकशाहीचा अर्थ फक्त बहुमत नाही, तर विश्वास, विचार आणि संघर्षही आहे. आजही महाराष्ट्राच्या खेड्यात, प्रत्येक बांधावर जाऊन विचारा राष्ट्रवादी कोणाची? तर प्रत्येकजण सांगतो - शरद पवारांची, असा टोला मेहबूब शेख यांनी उमेश पाटील यांना लगावला आहे. या उत्तरामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात पुन्हा एकदा "इतिहास विरुद्ध कायदेशीर मान्यता" असा वाद पेटला आहे.

आणखी वाचा

Umesh Patil : संस्थापकत्त्व म्हणजे पक्षावर कायमची मालकी नव्हे, उमेश पाटलांची सुप्रिया सुळेंना उद्देशून सूचक पोस्ट; व्हायरल होताच सगळं डिलीट केलं