Maharashtra ZP Elections and Panchayat Samiti Election Results 2026: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी पार पडलेल्या मतदानाचा निकाल (Maharashtra Elections 2026) आज जाहीर होणार आहे.  जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समित्यांच्या 1,462  जागांसाठी ही निवडणूक झाली होती. या निकालात कोणता पक्ष बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. साधारण चार ते पाच तासांमध्ये या निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर या 12 जिल्हापरिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांसाठी सरासरी 68.28 टक्के मतदान झाले होते. या निवडणुकांचे वर्णन मिनी मंत्रालय असे करण्यात येते. ग्रामीण भागातील विकासकामे आणि निधीवाटपाच्यादृष्टीने पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा महत्त्वाच्या असतात. त्यामुळे याठिकाणी आता कोणाची सत्ता येणार, हे आज स्पष्ट होईल. (Maharashtra ZP Elections Results 2026)

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाची सरशी होणार, हे बघावे लागेल. यापूर्वी झालेल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप राज्यातील सर्वाधिक मोठा पक्ष ठरला होता. त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळाले होते. मात्र, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार सुरु असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला होता. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात निवडणुकीचा प्रचार थंडावला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर प्रमुख नेत्यांनी प्रचारसभा घेणे टाळले होते. त्यामुळे फारसा प्रचार न झालेल्या या निवडणुकांचा निकाल काय लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

जिल्हा परिषद  आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा अशा सर्वच ठिकाणी स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर विशेषत: पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमधील मतदारांनी कोणाच्या पारड्यात दान टाकले, हे आज स्पष्ट होईल. यापूर्वी महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने युती केली होती. मात्र, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये त्याचा फारसा फायदा झाला नव्हता. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचार केला नव्हता. त्यामुळे या निवडणुकीत पुणे जिल्ह्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीला सहानुभूतीचा फायदा मिळणार का, हे बघावे लागेल.

आणखी वाचा

Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates: गुलाल कुणाचा? 12 जिल्हा परिषदांच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हातात? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर