Vidhan Parishad Election मुंबई :महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. पुणे पदवीधर, पुणे शिक्षक, मराठवाडा पदवीधर, अमरावती शिक्षक आणि नागपूर पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरुन महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार घडामोडी सुरु आहेत. महायुतीत पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट झालंय. महायुतीमधील जागा वाटपाच्या घडामोडींनतर सर्वाधिक चर्चा पुणे शिक्षक मतदारसंघाची होत आहे.महायुतीत पुणे शिक्षकमधील उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या सचिन सानप आणि मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं म्हटलंय. त्यामुळं महायुतीत या मतदारसंघात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.   

Continues below advertisement

महायुतीत पुणे शिक्षक मतदारसंघात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच होती. वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला आहे. भाजपकडून कोल्हापूरमधील कौस्तुभ गावडे यांनी त्यांना उमेदवारी मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. तर, काही दिवसांपूर्वी माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी पंढरपूरमधून प्रचार सुरु केला असून भाजपकडून उमेदवारी मिळेल, अशी त्यांनी आशा व्यक्त केली होती.  

सचिन सानप काय म्हणाले? 

मंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय सचिन सानप यांनी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षकांचा प्रतिनिधी हा शिक्षक असावा. शिक्षकांचा आमदार हा शिक्षक असावा ही प्रमुख भूमिका घेऊन मी या निवडणुकीत उतरलोय, असं म्हटलं. येत्या 5 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. महायुतीकडून उमेदवारी मिळावी यासाठीची अपेक्षा करत आहे. गुणवत्तेच्या आधारावर, शिक्षक आहे या आधारावर उमेदवारी मिळेल, अशी आशा आहे, मात्र तसा निर्णय झाला नाही तर  शिक्षक संघटनांच्या आग्रहाखातर आणि विश्वासावर निवडणुकीला सामोरं जावं लागेल, असं सचिन सानप म्हणाले.   

Continues below advertisement

मंगेश चिवटे 6 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार 

मंगेश चिवटे यांनी एबीपी माझासोबत बोलताना गेल्या दोन वर्षांपासून शिक्षकांसाठी आवाज उठवत असल्याचं म्हटलं. शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठीच्या आंदोलनात सहभाग घेतला आहे. पुणे पदवीधर संदर्भात अद्याप सस्पेन्स कायम आहे. हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला न येता मित्रपक्ष भाजपच्या वाट्याला गेल्याच्या बातम्या येत आहेत. एकनाथ शिंदेंच्या आदेशानं जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज भरण्याची तयारी केलेली आहे. पुणे शिक्षक मतदारसंघ शिवसेनेला मिळवण्यात एकनाथ शिंदे यांना यश येईल आणि शिवसेनेच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं मंगेश चिवटे यांनी म्हटलं.

काँग्रेसकडून जयंत आसगावकर यांना उमेदवारी 

महाविकास आघाडीत काँग्रेसनं पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसनं उमेदवारी जयंत आसगावकर यांना जाहीर केली आहे. जयंत आसगावकर हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. गेल्या निवडणुकीत जयंत आसगावकर यांनी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार जितेंद्र पवार, अपक्ष उमेदवार माजी आमदार दत्तात्रय सावंत यांचा पराभव केला होता. दत्तात्रय सावंत यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती.    

Election Schedule: विधानपरिषद निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक

अधिसूचना जारी (Notification Date): 29 सप्टेंबर 2026 

उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख (Nomination Last Date): 6 ऑक्टोबर 2026

अर्जांची छाननी (Scrutiny): 7 ऑक्टोबर 2026

अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख (Withdrawal Last Date): 9 ऑक्टोबर 2026

मतदानाची तारीख व वेळ (Poll Date & Time): 23 ऑक्टोबर 2026 (सकाळी 8 ते दुपारी 4)

मतमोजणी व निकाल (Counting Date): 27 ऑक्टोबर 2026