मुंबई:महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्र भाजपकडून विधान परिषदेच्या जागांसाठी यादी दिल्लीच्या नेतृत्वाला पाठवण्यात आली आहे. केंद्रीय नेतृत्वाला भाजपकडून ३० जणांची यादी पाठवण्यात आली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संघटनेत काम करणाऱ्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. विधान परिषदेच्या 9 जागांपैकी भाजपच्या वाट्याला 5 जागा येणार आहेत. भाजपकडून 5 नावांसाठी 30 जणांची यादी केंद्रीय नेतृत्वाला सोपवण्यात आली आहे.
भाजपनं पाठवेलली नाव :
माधवी नाईक, डॉ. उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक, केशव उपाध्ये, रवी अनासपुरे, राजेश पांडे, दयाशंकर तिवारी, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकर, संजय काका पाटील, विवेक कोल्हे, जगदीश मुळीक, प्रमोद जठार, संजय केणेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी अशी नावं यादीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
नावं दिल्ली पाठवण्यापूर्वी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक
महाराष्ट्र भाजपकडून कोअर कमिटीची विधानपरिषदेच्या उमेदवारांच्या नावांची यादी दिल्लीला पाठवण्यापूर्वी बैठक पार पडली होती. या बैठकीत विधानपरिषदेच्या उमेदवारांच्या नावांची चर्चा करण्यात आली.महाराष्ट्र भाजपकडून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी निकष ठरवण्यात आले.सकाळी बैठक झाल्यानंतर पुन्हा आज रात्री 10 वाजता भाजपच्या कोअर कमिटीची वर्षा निवासस्थानी बैठक घेण्यात येणार होती.
कालच्या बैठकीत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील नावांवर खलबतं करण्यात आली होती.आज उर्वरित विभागातील नावांवर चर्चा होणार आहे. प्रामुख्याने संघटनेत काम करणाऱ्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला होता. आज सकाळी झालेल्या विधान परिषदेच्या बैठकीत इच्छुक उमेदवाराच्या नावांवर विभागवार चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यापैकी एक जागा प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिल्यानं रिक्त झाली होती. त्या जागी भाजपकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणाला संधी?
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला दोन जागा येणार आहेत. एकनाथ शिंदे राज्यसभा निवडणुकीप्रमाणं धक्कातंत्र राबवतात का ते पाहावं लागेल. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार कोणाला संधी देतात याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर, महाविकास आघाडीला एका जागेवर उमेदवार निवडून आणता येऊ शकतो, त्यासाठी उद्धव ठाकरेंच्या नावाची चर्चा आहे.
