Maharashtra Vidhan Parishad Election 2026: राज्यात विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) नऊ जागांसाठी येत्या 12 मे रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आता अवघे दोन दिवस शिल्लक असताना, महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) उमेदवाराच्या नावावरून मोठा पेच निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेषतः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीच ही निवडणूक लढवावी, यासाठी मविआतील नेते आग्रही असल्याची माहिती मिळत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे स्वतः ही निवडणूक लढवण्यास फारसे इच्छुक नाहीत. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) या दोन्ही मित्रपक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी ही जागा उद्धव ठाकरे यांनीच भूषवावी, असा आग्रह धरला आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांकडूनही उद्धव ठाकरेंचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचं मन वळविण्यात मविआचे नेते यशस्वी होणार?
जर उद्धव ठाकरे यांनी अंतिम निर्णय नाकारला, तर त्यांच्या पक्षातून विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, नेत्या सुषमा अंधारे, माजी खासदार विनायक राऊत, माजी खासदार राजन विचारे आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्यात चुरस असल्याचे समजते. तर काँग्रेस पक्षाकडूनही बाळासाहेब थोरात, मुझफ्फर हुसेन, सचिन सावंत आणि राजेश राठोड यांची नावे चर्चेत आहेत. आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले असल्याने, महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते उद्धव ठाकरेंना निवडणुकीसाठी तयार करण्यात यशस्वी होतात की नवीन चेहरा समोर येणार? तसेच उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवण्यासाठीचा आग्रह महाविकास आघाडीतील नेते शेवटच्या दिवसांपर्यंत कायम ठेवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
BJP : भाजपमध्ये 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा
दुसरीकडे, संख्याबळानुसार महायुतीचे पारडे जड आहे. विधानसभेतील सध्याच्या गणितानुसार, एका उमेदवाराला विजयासाठी 29 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीला 8 जागा, तर मविआला 1 जागा सहज मिळताना दिसत आहे. भाजपने आपल्या 6 जागांसाठी राम सातपुते, संदीप जोशी, केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजितसिंह निंबाळकर अशा नेत्यांच्या नावांची चाचपणी सुरू केली असून, भाजपकडून पुन्हा एकदा 'धक्कातंत्र' वापरले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विधान परिषदेतील पुढील 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)
- उद्धव ठाकरे (शिवसेना - उबाठा)
- नीलम गोऱ्हे (शिवसेना)
- शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी - शरद पवार गट)
- अमोल मिटकरी (राष्ट्रवादी - अजित पवार गट)
- गोपीचंद पडळकर (भाजप)
- रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप)
- राजेश राठोड (काँग्रेस)
- प्रवीण दटके (भाजप)
- रमेश कराड (भाजप)
आणखी वाचा
