Maharashtra Politics: आमचा बाप बाळासाहेब ठाकरे, तुमचा कोण?; शिंदेंच्या मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय घडलं?
Maharashtra Politics: भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी धाराशिव येथील भाषणात शिवसेनेवर नाव न घेता टीका केली होती.

Maharashtra Politics मुंबई: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची (Maharashtra Cabinet Meeting) आज (10 जून) मुंबईत बैठक झाली. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'कोण कोणाचा बाप' यावर चांगलीच चर्चा झाली. शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांची तक्रार केल्याची सूत्रांची माहिती आहे.
भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी धाराशिव येथील भाषणात शिवसेनेवर नाव न घेता टीका केली होती. सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसला आहे, असं नितेश राणे म्हणाले होते. नितेश राणेंचं हे वाक्य शिवसेना मंत्र्यांच्या जिव्हारी लागले. त्यामुळे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांकडेच तक्रार केल्याची माहिती समोर येत आहे.
आमचा बाप बाळासाहेब ठाकरे, तुमचा कोण?
आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, तुमचा कोण?, असा सवाल शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नितेश राणे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. या प्रकारचे बोलणे टाळले पाहिजे, असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंना दिला.
नितेश राणे नेमकं काय म्हणाले होते?
धाराशिव जिल्हा नियोजन समितीमधील निधीवाटपाच्या स्थगितीवर बोलताना नितेश राणे यांनी घटक पक्षांना गर्भित इशारा दिला. कुणी कितीही ताकद दाखवली, कसेही नाचलं तरी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसलाय हे लक्षात ठेवा असा दमच नितेश राणेंनी दिला होता. सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय सगळ्यांनी लक्षात ठेवा, अशी धमकीच नितेश राणेंनी स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांना दिली. कुणी कितीही ताकद दाखवली , कोणीही कसेही नाचले तरी देशात भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याचं लक्षात ठेवा, असेही नितेश राणे म्हणाले होते. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असले तरी धाराशिवच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाहीत. म्हणूनच, जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती मिळाल्याचं नितेश राणेंनी म्हटलं होतं.
भाजप आणि शिवसेनेत जिल्हा नियोजन समिती निधीवरून सुप्त संघर्ष-
राणे बंधूंमधला हा पक्षीय संघर्ष पेटलाय तो धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगितीवरून...कुणी कितीही ताकद दाखवली, कसेही नाचले तरी सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय हे लक्षात ठेवा असं वक्तव्य नितेश राणेंनी मित्रपक्ष शिवसेनेला दिलं. शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक हे धाराशिवचे पालकमंत्री आहेत. भाजपच्या राणा जगजीतसिंह पाटील यांच्या तक्रारीनंतर प्रताप सरनाईकांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती देण्यात आलीय. तिथे भाजप आणि शिवसेनेत जिल्हा नियोजन समिती निधीवरून सुप्त संघर्ष सुरू आहे. त्यावरून नितेश राणेंनी शिवसेनेला उद्देशून बोचरी टीका केली होती.
























