मुंबई: राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच अनेक नेते आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर पक्षांतर करत असल्याचं दिसून येत आहे. अशातच आज भाजपमध्ये काही बडे नेते पक्षांतर करणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार पवार काका-पुतण्यांना धक्का देत इंदापूरचे प्रवीण माने यांनी सुद्धा भाजपात प्रवेश केला आहे. त्याचबरोबर राजू शेट्टी यांचे जवळचे सहकारी आणि शेतकरी नेते सावकार मादनाईक भाजपात गेले आहेत. माजी शिक्षक आमदार अपूर्व हिरेंनी देखील भाजपात प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार आणि प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अपूर्व हिरे यांच्या भारतीय जनता पक्षात प्रवेशाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चांना उधाण आलं होतं. आज डॉ. अपूर्व हिरे यांनी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात शेकडो समर्थकांसह अधिकृत पक्षप्रवेश केला आहे. भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत डॉ. अपूर्व हिरे यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण व शहरी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे डॉ. हिरे यांनी सांगितले होते. ग्रामीण आणि शहरी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव तसेच भाजपच्या विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे हा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
राजू शेट्टींचे साथीदार सावकार मादनाईकांचा भाजपमध्ये प्रवेश
माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत प्रदीर्घ काळ काम केलेल्या सावकार मादनाईक यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. सावकार मादनाईक चळवळीतील कार्यकर्ते आहेत. आज मुंबईमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत दादा पाटील, यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजप प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजू शेट्टी यांची भूमिका न पटल्याने मादनाईक नाराज झाले होते. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र भूमिका घेतली होती. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सुद्धा फटका बसला होता. 2002 पासून सावकार मादनाईक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासमवेत होते. सावकार मादनाईक यांच्या यांच्या भाजप प्रवेशामध्ये माधवराव घाटगे यांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याची चर्चा आहे. त्यासाठी मुंबईमध्ये बैठकही झाल्या होत्या. दुसरीकडे स्वाभिमानीतून सावकार जाऊ नयेत यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र भाजपकडून त्यांचा प्रवेश निश्चित झाला होता.
पवार काका-पुतण्यांना दे धक्का
शरद पवार यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक आणि विधानसभा निवडणुकीपासून दुरावलेले जिल्हा परिषदेचे माजी सभापती दशरथ माने यांचे चिरंजीव पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला आहे. इंदापूरच्या राजकारणात महत्वपूर्ण भूमिकेत असणाऱ्या मानेंनी भाजपात प्रवेश केल्याने तालुक्यात पक्षाला मोठा चेहरा मिळाला आहे.
पक्षप्रवेशानंतर बोलताना ते म्हणाले, माझ्या वैयक्तिक आयुष्यातील सुवर्ण अक्षराने लिहावा असा क्षण आहे.आपण मला भारत व विश्वातील सर्वात मोठ्या पक्षात सामील करून घेतले, त्याबाबत रविंद्र चव्हाण यांचे आभार. मोदींच्या विचाराने प्रेरित होऊन मी प्रवेश करत आहे. राज्यात चौफेर विकासाची कामे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहेत. उद्योग व गुंतवणूक करण्यात महाराष्ट्र नंबर वन झाला आहे. आमची भौगोलिक परिस्थिती चांगली आहे. येत्या काळात इंदापूरच्या विकासकामांना मदत करावी ही विनंती आहे. अपक्ष असताना विधानसभा निवडणुकीत मला 40 हजार मते मिळाली होती. त्यानंतर कुठेतरी समाविष्ट होण्याची चर्चा कार्यकर्त्यांनी केली. त्यावेळी एकच नाव पुढे आले ते म्हणजे भाजप. आपण कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. रविंद्र चव्हाण यांसारखा एक सामान्य कार्यकर्ता आज प्रदेशाध्यक्ष झाल्याचे काल पाहायला मिळाले, हे फक्त भाजपामध्ये होऊ शकते असं म्हणत माने यांनी पक्षाचं कौतुक केलं आहे.