Maharashtra Municipal Election 2026 : महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मुंबई वगळता राज्यातील 29 पैकी 28 महानगरपालिकांमध्ये प्रभाग पद्धतीने निवडणूक होत आहेत. या निवडणुकांमध्ये 'मतदार' हा सर्वात महत्त्वाचा केंद्रबिंदू असतो. मात्र, आजही अनेक नागरिकांकडे मतदार ओळखपत्र नाही किंवा काही कारणास्तव ते गहाळ झाले आहे. अशा मतदारांसाठी निवडणूक आयोगाने मोठी सवलत दिली आहे.

Continues below advertisement

ओळखपत्र नाही, पण यादीत नाव असणं अनिवार्य

भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) नियमांनुसार, मतदान करण्यासाठी तुमच्याकडे 'इलेक्ट्रॉनिक फोटो ओळखपत्र' (EPIC) असणे उत्तम, पण ते नसल्यास घाबरण्याचे कारण नाही. मतदानासाठी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे अधिकृत मतदार यादीत तुमचे नाव असणे. जर तुमचे नाव यादीत असेल, तर तुम्ही मतदान केंद्रावर निवडणूक स्लिप (Voter Slip) आणि त्यासोबत अन्य अधिकृत ओळखपत्र दाखवून मतदान करू शकता.

Continues below advertisement

पर्यायी ओळखपत्रे म्हणून काय वापरता येईल?

जर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसेल, तर खालीलपैकी कोणतेही एक सरकारमान्य ओळखपत्र दाखवून तुम्ही मतदान केंद्रात प्रवेश मिळवू शकता.

आधार कार्ड

पॅन कार्ड (PAN Card)

पासपोर्ट

ड्रायव्हिंग लायसन्स

मनरेगा जॉब कार्ड

फोटो असलेले पेन्शन कार्ड

केंद्र किंवा राज्य सरकारचे कर्मचारी ओळखपत्र

बँक किंवा पोस्ट ऑफिसने जारी केलेले फोटोसह पासबुक

कामगार मंत्रालयाने जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड

महत्त्वाची टीप : केवळ 'व्होटर स्लिप' असून चालणार नाही, त्यासोबत वरीलपैकी एक फोटो असलेले ओळखपत्र असणे ओळख पटवण्यासाठी आवश्यक आहे.

तुमचे नाव मतदार यादीत तपासा

तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही, हे तपासण्यासाठी तुम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता किंवा 'Voter Helpline' ॲपचा वापर करू शकता. जर तुमचे नाव यादीत असेल, तर ओळखपत्राच्या काळजीशिवाय तुम्ही लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊ शकता.

हे ही वाचा -

Raj Thackeray On BMC Election 2026: निवडणूक आयोगाने 'पाडू' मशीन आणलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल, मतदानाच्या एक दिवसाआधी काय घडलं?