Maharashtra Live Blog Updates: शिवभोजन थाळीचे १० महिन्यांचे थकीत बिल; महिला बचत गटांचा महसूलमंत्री बावनकुळे यांना घेराव
Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स...
LIVE

Background
Maharashtra Live Blog Updates: चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांच्या अचानक घेण्यात आलेल्या पदग्रहण सोहळ्यात पुन्हा एकदा मुनगंटीवार-जोरगेवार वादाचा भडका उडालाय. चंद्रपूर शहराचे स्थानिक आमदार असूनही किशोर जोरगेवार यांना पदग्रहणासाठी बोलवण्यात न आल्याचं म्हणत जोरगेवार गटाच्या 16 नगरसेवकांनी पदग्रहण कार्यक्रमाचा बहिष्कार केला. काल दुपारी सुधीर मुनगंटीवार यांनी अचानक महापौर आणि उपमहापौर यांचा पदग्रहण सोहळा होणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर तातडीने सर्व भाजप कार्यकर्ते आणि मुनगंटीवार समर्थक नगरसेवक महानगरपालिकेत दाखल झाले. अचानक होणाऱ्या या पदग्रहण सोहळ्याची कुणकुण लागताच जोरगेवार समर्थक नगरसेवक देखील महानगरपालिकेत दाखल झाले आणि त्यानंतर जोरगेवार समर्थक नगरसेवकांनी जोरगेवारांना का बोलावलं नाही असा सवाल करत पदग्रहण कार्यक्रमावर बहिष्कार घातला. यामुळे मुनगंटीवार-जोरगेवार वादाचा पुन्हा एक नवीन अध्याय पाहायला मिळाला.
बोईसर पूर्वेत अनधिकृत बांधकामांवर महसूल विभागाची धडक कारवाई
बोईसर पूर्वेतील दांडी पाडा व लोखंडी पाडा परिसरात उभारलेल्या अनधिकृत बांधकामांवर पालघर महसूल विभागाने मोठी कारवाई केली. रमेश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली सकाळपासून ही मोहीम राबवण्यात आली. कारवाईदरम्यान पोलीस बंदोबस्त तैनात होता. काही व्यक्तींनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली; पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतले. प्रशासनाने अनधिकृत बांधकामांविरोधात कठोर भूमिका कायम ठेवत, पुढेही अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे.
जोगेश्वरीतील सिटी इंटरनॅशनल शाळा अचानक बंद? 600 विद्यार्थ्यांच्या पालकांत भीती; मनसे आक्रमक
मुंबई: जोगेश्वरी पश्चिमेतील ओशिवरा परिसरात गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेली सिटी इंटरनॅशनल स्कूल अचानक बंद करण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शाळेत शिकणाऱ्या सुमारे ६०० विद्यार्थ्यांच्या पालकांना नोटीस देण्यात आली असून, यामुळे पालकांमध्ये गोंधळ आणि भीतीचे वातावरण आहे.
शाळा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, शाळेची जागा भाडेतत्त्वावर असून ३५ लाखांवरून थेट ५० लाख रुपये भाडेवाढ करण्यात आल्याने हा खर्च परवडणारा नसल्यामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे.
या निर्णयाविरोधात मनसे आक्रमक झाली असून, वर्सोवा विधानसभा विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांनी शाळा बंद होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. शाळा प्रशासनाने भूमिका बदलली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, पालकांनी शिक्षण विभागाने तातडीने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
























