Maharashtra Goverment On Student Protest: महाराष्ट्रातील विद्यार्थी, तरुण आंदोलनकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नीट पेपरफुटी (NEET Exam Paper Leak) आणि दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनात विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून मुंबईसह राज्यभर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी, तरुण आणि इतर आंदोलनकर्त्यांना न्यायालयीन कारवाईतून दिलासा देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, परीक्षा पेपरफुटी व इतर मागण्यांसाठी झालेल्या आंदोलनांमधील विद्यार्थ्यांवरील व तरुण आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मुदत 31 मार्च 2027 पर्यंत वाढवण्यात आली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने देखील गंभीर गुन्हे नसलेल्या विद्यार्थी आंदोलकांवर कारवाई न करण्याचे व गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्य सरकारने सुद्धा या विद्यार्थ्यांची गुन्हे मागे घेण्यास संदर्भातला निर्णय घेतला. यासंबंधीचा गृह विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.  राजकीय पक्ष व सामाजिक संघटना यांच्याकडून सार्वजनिक हिताच्या व वेगवेगळ्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी घेराव घालणे, मोर्चे काढणे, निदर्शने करणे इ. स्वरुपाचे आंदोलनाचे मार्ग अनुसरले जातात. त्यामुळे त्यांच्याविरुध्द कायद्याचे उल्लंघन केल्याने गुन्हे दाखल होऊन, तपासानंतर न्यायालयात दोषारोपपत्रे दाखल केली जातात. राजकीय व सामाजिक आंदोलनामुळे उद्भवलेल्या ज्या गुन्ह्यांमध्ये 31 जुलै, 2026 पर्यंत दोषारोपपत्र दाखल झालेले आहेत, असे खटले मागे घेण्यास  शासन निर्णयान्वये मान्यता दिली होती. (Maharashtra Goverment On Student Protest)

आंदोलनातील दोषारोपपत्रे दाखल झालेले खटले मागे घेण्याच्या कालावधीत वाढ- (Maharashtra Goverment On Student Protest)

सद्यस्थितीत खटले काढून घेण्याकरिता असलेली 31 जुलै, 2026 पर्यंतची मुदत संपली आहे. तसेच दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्यात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनात सहभागी विद्यार्थी, तरुण व इतर यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, सदर गुन्ह्यांच्या अनुषंगाने दाखल खटले मागे घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुषंगाने राजकीय सामाजिक आंदोलनातील दोषारोपपत्रे दाखल झालेले खटले मागे घेण्याच्या कालावधीत वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. राजकीय व सामाजिक आंदोलनातील ज्या गुन्ह्यांमध्ये 31 मार्च 2027 पर्यत दोषारोपपत्रे दाखल होतील, असे खटले शासन निर्णयातील तरतुदर्दी व कायदेशीर तरतुदींनुसार मागे घेण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली.

भरती परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी राज्यात उच्चस्तरीय समिती-(Maharashtra Goverment On Student Exam)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थान, मुंबई येथे महाराष्ट्रातील विविध सेवाभरतींसाठी होणाऱ्या परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात बैठक पार पडली. महाराष्ट्रात विविध सेवाभरतींसाठी होणाऱ्या परीक्षापद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित, आणि सर्वसंमत सुधारणा करण्यासाठी  उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी घेतला. ही समिती प्रत्येक महसुली विभागात जाऊन विद्यार्थी, शिक्षण संस्थाचालक आणि संबंधित घटकांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेईल. त्याआधारे राज्यासाठीचे समग्र धोरण निश्चित केले जाईल. केंद्र सरकारने पेपरफुटीसंदर्भात आणि परीक्षा गैरव्यवहारासंदर्भात संसदेत कायदा केला आहे. महाराष्ट्रातही यासंदर्भात स्वतंत्र कायदा आहे. तथापि, संसदेने केलेला कायदा अधिक कठोर असल्याने तो महाराष्ट्रातही लागू करण्यासंदर्भातील प्रक्रिया येत्या पंधरवड्यात पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच, राज्यात किमान 25,000 सुरक्षित क्लासरूम उभारण्यात याव्यात, असेही निर्देश मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

संबंधित बातमी:

पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश