मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक विशेष व्हिडिओ शेअर करत 'महाराष्ट्र-नेक्स्ट' (Maharashtra-Next) हे नवे अभियान जाहीर केले आहे. 'आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा, आपल्यालाच विचार करायचा' असा नारा देत राज ठाकरे यांनी नव्या पिढीला आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याला साद घातली आहे.(MNS Gudhi Padwa Melava 2026) 

या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास, गड-किल्ले, छत्रपती शिवाजी महाराज आणि कष्टकरी जनतेचे प्रतिबिंब उमटले आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला रायगडासारख्या किल्ल्यांचे विहंगम दृश्य दाखवण्यात आले असून, "दिल्लीचेही तख्त झुकावे, शौर्य असे दाखवूया" अशा ओळींतून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची जाणीव करून दिली आहे.(MNS Gudhi Padwa Melava 2026) 

राज ठाकरेंच्या व्हिडिओतील मुख्य वैशिष्ट्ये

व्हिडिओमध्ये शेतकरी, कष्टकरी आणि चाकरमानी यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे.भविष्यातील महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी तरुणांनी आणि नव्या पिढीने पुढे येण्याचे आवाहन यात करण्यात आले आहे. उद्योजक, नोकरी करणारे तरुण आणि सामान्य नागरिक या सर्वांना एकत्र घेऊन एक प्रगत महाराष्ट्र घडवण्याचे स्वप्न 'महाराष्ट्र-नेक्स्ट'च्या माध्यमातून मांडण्यात आले आहे.

व्हिडिओच्या शेवटी मनसेचे 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' आणि 'महाराष्ट्र-नेक्स्ट' हे लोगो झळकतात. राज ठाकरे यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने आपली रणनीती स्पष्ट केल्याचे दिसून येत आहे. "नव्या पिढीचा, नव्या युगाचा, पुढचा महाराष्ट्र घडवूया" असा दृढ निर्धार या अभियानातून व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबईत आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा; ठाकरे बंधूंच्या युतीनंतरचा पहिला मेळावा

मुंबईतील शिवाजी पार्कवर दरवर्षीप्रमाणे मनसेचा गुढीपाडवा मेळावा (MNS Gudhi Padwa Melava 2026) आज पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होणार मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे या मेळाव्यातून कार्यकर्त्यांना संबोधित करणार असून, पक्षाची आगामी भूमिका काय असेल, याबाबत कानमंत्र देतील. ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीनंतर हा पहिलाच गुढीपाडवा मेळावा असल्याने, या युतीवर राज ठाकरे काय भाष्य करणार? या मेळाव्यासाठी विशेष दोन स्क्रीन ही मैदानात लावल्या आहेत त्यामुळे त्यावर कोणाचा व्हिडिओ लावला जाणार? संध्याकाळी 6 वाजता मेळाव्याला सुरुवात होईल. राज ठाकरे या भाषणात नेमकं काय बोलणार याकडे लक्ष असेल.

ठाकरे कोणती भूमिका मांडणार? (Raj Thackeray MNS Gudhi Padwa Melava 2026)

राज ठाकरे यांचा 2026 चा गुढीपाडवा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्कवर पार पडत असून, त्यासाठीची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आहे. आगामी राजकीय रणनीती आणि पक्षाची पुढची वाटचाल यावर या मेळाव्यात ते महत्त्वाची भूमिका मांडणार असल्याने सर्वांचे लक्ष या सभेवर लागले आहे. यापूर्वी झालेल्या पदाधिकारी बैठकीत रणनीतीवर चर्चा झाली होती, ज्याचाच एक भाग म्हणून हा मेळावा होणार आहे.