लातूर : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद (ZP) निवडणुकांच्या मतमोजणीदरम्यान लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील कामखेडा जिल्हा परिषद गटाचा निकाल सर्वाधिक चर्चेचा ठरला. या गटात सख्या भावजया एकमेकांविरोधात निवडणूक रिंगणात उतरल्याने लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अखेर दोन्हीपैकी कोणीतरी एकच विजयी होणार आणि दुसऱ्याचा पराभव होणार हे जरी अंतिम सत्य असलं तरी कोण जिंकणार आणि कोण पराभूत होणार याची सर्वांनाच होती. मात्र, अत्यंत अटीतटीच्या ठरलेल्या या लढाईत थोरल्या जाऊबाईंना धाकट्या जाऊबाईंनी मात दिलीय. काँग्रेसच्या आशाताई भिसे यांनी त्यांच्याच थोरल्या भावजय सरिता भिसे यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव करत निसटता विजय मिळवला. या विजयानंतर काँग्रेसने (Congress) गुलाल उधळत विजयी जल्लोष केला.
लातूर महापालिका निवडणुकीत भाजपला धक्का देत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवलं होतं. राज्यातील एकमेव महापालिकेत काँग्रेस नेते अमित देशमुख यांच्या नेतृत्वात काँग्रेसने सत्ता स्थापन केली. त्यामुळे, जिल्हा परिषद निवडणुकीत काय होणार, जनता कुणाला कौल देणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. अखेर, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही जनतेनं लातूरमध्ये भाजपविरोधात कौल दिलाय. येथे काँग्रेसने 23 जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र, येथील कामखेडा जिल्हा परिषद गटातील लढतीची सर्वत्र चर्चा रंगली. येथे फक्त दोन मतांच्या फरकाने मिळालेल्या विजयामुळे कामखेडा गटात दोन जावा-जावांमध्ये अक्षरशः थरार पाहायला मिळाला.
काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी आमदार त्र्यंबक नाना भिसे यांना या निकालामुळे मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार त्रिंबक नाना भिसे यांनी निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद लावली होती. मात्र, काँग्रेसने अचूक खेळी करत मतदार बांधून ठेवण्यात यश मिळवलं. सुक्ष्म निरीक्षण आणि रणनीतीमुळेच अवघ्या दोन मतांनी हा विजय मिळवता आला. भावजया आमने-सामने असलेल्या या निवडणुकीत धाकट्या जाऊबाईने थोरल्या जाऊबाईचा केलेला पराभव हा निवडणुकीतील सर्वात नाट्यमय क्षण ठरला आहे. अवघ्या दोन मतांनी ठरलेला हा निकाल लातूर जिल्हा परिषद निवडणुकीतील सर्वात थरारक आणि चर्चेचा विषय ठरत आहे.
अंतिम आकडेवारीलातूर जिल्हा परिषद विजयी : 59/59
भाजप : 18काँग्रेस :23शिवसेना : 01शिवसेना UBT: 01NCP अजित पवार : 12NCP शरद पवार : 01वंचित : 00मनसे : 01अपक्ष : 02