Kishori Pednekar on Ritu Tawde: मुंबईच्या महापौर रितू तावडे (Ritu Tawde) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्यांच्या नव्या कोऱ्या गाडीवर लावण्यात आलेल्या लाल-निळ्या फ्लॅश दिव्यांमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. केंद्र सरकारने मे 2017 मध्ये सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा वापरण्यास बंदी घातली होती. व्हीआयपी संस्कृती कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयानंतर बहुतांश सरकारी वाहनांवरील लाल दिवे हटवण्यात आले होते. मात्र, महापौरांच्या नव्या वाहनावर पुन्हा लाल-निळे फ्लॅश दिवे दिसल्याने नियमांचे उल्लंघन होत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. तसेच, मुंबई महापालिकेत भाजप सत्तेत आल्यानंतर व्हीआयपी संस्कृतीने पुन्हा डोके वर काढल्याचा आरोप ही विरोधकांकडून केला जात आहे. आता मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी रितू तावडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
Kishori Pednekar on Ritu Tawde: नेमकं काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?
मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटले आहे की, नियमांना ब्रेक आणि महापौरांच्या गाडीला झगमगाट, मुंबईत व्हीआयपी संस्कृतीची पुन्हा एन्ट्री? दोन दिवसांपूर्वीच महापौर मॅडम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या जीआरला दिलेल्या सूचनेला हरताळ फासला. आता तर केंद्र सरकार यांनी दिलेला निर्णयाला हरताळ फासला आहे. व्हीआयपी संस्कृती पंतप्रधान मोदी, केंद्र सरकार यांनी संपवली होती. पण, मुंबईच्या महापौरांना व्हीआयपी संस्कृतीचा मोह टाळता आला नाही. पंतप्रधान मोदी केंद्र सरकारचे निर्णय... महापौर पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी रितू तावडे यांच्यावर निशाणा साधलाय.
Milind Narvekar on Kishori Pednekar: "नवनिर्वाचित महापौरांच्या विरोधात नक्की काय चाललंय?"
ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी देखील एक्सवर पोस्ट केली आहे. कधी महापौरांचे घड्याळ तर कधी गाडी तर कधी त्यांनी केलेली वक्तव्य हे चांगली चर्चेत राहतात. शिवाय त्यामुळे वाद सुद्धा निर्माण होतोय. "मात्र महापौरांच्या विरोधात नक्की काय चाललंय?" अशी एक पोस्ट करत मिलिंद नार्वेकर यांनी भाजपच्या अंतर्गत गटबाजीवर बोट दाखवल्याचे दिसून येत आहे. या ना त्या कारणामुळे महापौरांना टार्गेट केलं जात आहे. त्यामुळे या महापौरांच्या विरोधात नक्की काय सुरु आहे? असं म्हणत महापौर झाल्यानंतरही भाजपमधील अंतर्गत धूसफूस आहे का? असा एक प्रकारे सवाल ठाकरेंच्या शिवसेनेकडून विचारण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
Ritu Tawde: महापौरांच्या गाडीवरील लाल-निळे दिवे हटवले
दरम्यान, या वादानंतर महापौरांच्या अधिकृत गाडीवरील लाल-निळे दिवे दोन दिवसांपूर्वीच काढून टाकण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. नियमांचे पालन करत हे दिवे हटवण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सध्या महापौरांच्या वाहनावर कोणतेही विशेष दिवे नसल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय, महापालिकेतील इतर काही महत्त्वाच्या पदांवरील नेत्यांच्या वाहनांवरही अशा प्रकारचे दिवे बसवण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मात्र प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर दोन दिवसांपूर्वीच सर्व वाहनांवरील हे दिवे काढून टाकण्यात आल्याचेही पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आणखी वाचा
