KEM Hospital: मुंबईतील ऐतिहासिक ओळख असलेल्या केईएम रुग्णालयाच्या (KEM Hospital) नामांतरावरून आता राजकीय युद्ध पेटले आहे. राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी सुचवलेल्या नवीन नावाच्या प्रस्तावाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र विरोध दर्शवला आहे. तर या विरोधात रस्त्यावरच्या लढाईची हाक देखील देण्यात आली आहे.
KEM Hospital: काय आहे नेमका वाद?
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महानगरपालिकेला अधिकृत पत्र लिहून ब्रिटीश काळातील ‘किंग एडवर्ड मेमोरियल’ (KEM) हे नाव बदलून भारतीय संस्कृतीनुसार 'कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय' असे करण्याचे सुचवले आहे. विशेष म्हणजे, नवीन नावातूनही 'केईएम' हे संक्षिप्त रूप कायम राहील, असा दावा लोढा यांनी केला आहे. या प्रस्तावाला पालिकेच्या आरोग्य समितीने मंजुरी दिल्याची माहिती समोर येताच वादाला तोंड फुटले आहे.
Ajay Choudhari: मुंबई तुमच्या हातात राहिलेय का?
शिवडी विधानसभेचे आमदार अजय चौधरी यांनी समाजमाध्यमावर अत्यंत आक्रमक पोस्ट लिहीत मराठी माणसांना साद घातली आहे. "मराठी मनानो मराठी जनानो, गप गार थंड बसा... तुमची मुंबई तुमच्या हाती राहिली आहे का? ती तर लोढाची झाली आहे," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. या नामांतराच्या निषेधार्थ आज, सोमवार 27 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांच्या (Dean) केबिनबाहेर निदर्शने करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. "नाहीतर मुंबईचे लोढा मॅन्शन झालेच समजा," असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Milind Narvekar: इतर ऐतिहासिक वास्तूंची नावे बदलणार का?
दुसरीकडे, ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी याप्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे. "केईएम रुग्णालयाचे नाव तुम्ही बदलत असाल तर इतर ऐतिहासिक वास्तूंची नावे बदलणार का?," असा बोचरा सवाल त्यांनी विचारला आहे. दरम्यान, केवळ राजकीय पक्षच नव्हे, तर केईएममधील निवासी डॉक्टरांची संघटना 'मार्ड'नेही या नामांतराला कडाडून विरोध केला आहे. वैद्यकीय तज्ज्ञांना आणि डॉक्टरांना विश्वासात न घेता असा परस्पर निर्णय घेऊ नये, अशी भूमिका 'मार्ड'ने मांडली आहे.
आणखी वाचा
