मुंबई : ठाकरेंच्या शिवसेना (Shivsena) पक्षातील गळती काही केल्या कमी होताना दिसून येत नाही. गेल्याच महिन्यात ऑपरेशन टायगरच्या अंतर्गत ठाकरेंच्या सहा खासदारांनी आपला स्वतंत्र गट स्थापन करत उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला. त्यानंतर, या सहाही खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. तर, इतरही ठिकाणी जिल्हास्तरावर पक्षात काही बदल होत असल्याचं सातत्याने दिसून येतं. आता, ठाकरेंच्या शिवसेनेकडून लोकसभा (Kalyan) निवडणूक लढवलेल्या वैशाली दरेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे, वैशाली दरेकर आता कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. 

Continues below advertisement

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण लोकसभा जिल्हा महिला संघटक वैशाली दरेकर राणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वैशाली दरेकर यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात उबाठामधून उमेदवारी घेत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, आता वैयक्तिक कारणास्तव आपण पक्षाच्या कामाला वेळ देऊ शकत नसल्याने पदाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

''साहेब, मी वैशाली दरेकर राणे, महिला जिल्हासंघटक या पदावर दोन वर्षापासून कार्यरत आहे. परंतु, सध्या माझ्या वैयक्तिक कर्तव्यांमुळे मी सदर पदाला न्याय आणि वेळ देऊ शकत नाही. म्हणून, माझ्या महिला जिल्हा संघटक या पदाचा मी स्वेच्छेने राजीनामा देत आहे, त्याचा स्विकार करावा ही विनंती,'' असा मजकूर वैशाली दरेकर यांनी आपल्या राजीनामा पत्रात लिहिला आहे. 

Continues below advertisement

उद्धव ठाकरेंचा पारा चढला

ठाणे जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी आणि नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भात 'मातोश्री'वर बोलावण्यात आलेल्या बैठकीत जोरदार राडा झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतच ठाण्यातील दोन गटांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र शाब्दिक बाचाबाची झाली. हा प्रकार पाहून उद्धव ठाकरे अत्यंत संतापले आणि त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. ठाण्यातील कळवा आणि कल्याण मतदारसंघातील पक्षसंघटनेचा आढावा घेण्यासाठी या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कल्याणमधील काही पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीवरून हा वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा

Uddhav Thackeray : 'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांत जुंपली, उद्धव ठाकरेंचा पारा चढला अन्...