Kalyan Dombivli Mahangarpalika Election results 2026: कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आपला महापौर बसवण्यासाठी सुरु असलेल्या रस्सीखेचीमुळे याठिकाणी नाट्यमय राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीत शिवसेना-भाजपकडून ठाकरे गट आणि मनसे (MNS) यांचे निवडून आलेले नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाचे (Thackeray Camp) एकूण 11 नगरसेवक निवडून आले होते. मात्र, मंगळवारी कोकण भवनात गटाची नोंदणी करण्याच्यावेळी ठाकरे गटाचे फक्त 7 नगरसेवक उपस्थित होते. उर्वरित चार नगरसेवकांपैकी दोन जण बेपत्ता असून ते शिंदे गटाच्या गळाला लागल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर ठाकरे गटाचे दोन नगरसेवक मनसेत गेले आहेत. या चक्रावणाऱ्या राजकीय घडामोडींमुळे कल्याण-डोंबिवलीत सध्या रंजक राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. (Kalyan Dombivli Election 2026)

Continues below advertisement

ठाकरे गटाने मंगळवारी कोकण विभागीय आयुक्तांकडे आपल्या गटाची नोंदणी केली. यावेळी ठाकरे गटाकडून शिंदे गटाच्या संपर्कात असलेल्या आपल्या दोन नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, असे पत्र देण्यात आले. हे दोन्ही नगरसेवक गेल्या काही तासांपासून नॉट रिचेबल आहेत. ठाकरे गटाच्या गटनेता निवडीच्या सोमवारच्या बैठकीला या दोन्ही नगरसेवकांनी दांडी मारली होती. हे दोन्ही नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे समोर आल्यानंतर ठाकरेंच्या गोटात खळबळ उडाली होती. तर स्वप्नील केणे आणि राहुल कोट हे दोन नगरसेवक मनसेच्या गोटात दाखल झाले आहेत. हे दोघेही मूळचे मनसेचे होते. त्यामुळे आता मनसेच्या नगरसेवकांची संख्या 5 वरुन 7 इतकी झाली आहे. भाजप आणि शिंदे सेनेकडून सुरु असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे ठाकरे गटाने आपले 7 आणि मनसेचे 2 अशा सर्व 9 नगरसेवकांना अज्ञातस्थळी रवाना केले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेवर सत्ता स्थापन करायची असेल तर 62 हा बहुमताचा आकडा गाठणे महत्त्वाचे आहे. सध्या शिंदे यांच्या शिवसेनेकडे 53 नगरसेवक आहेत. तर भाजपाकडे 50 नगरसेवक आहेत. कालच्या घडामोडींनंतर ठाकरे गटाचे 7 तर मनसेचे 7 नगरसेवक आहेत. त्यामुळे सध्या कल्याण डोंबिवलीत वेगवान राजकीय घडामोडी सुरु आहेत.

Continues below advertisement

Uddhav Thackeray Shivsena: ठाकरे गटाचे कोणते नगरसेवक फुटले?

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले दोन नगरसेवक फुटले आहेत. मधुर म्हात्रे आणि किर्ती ढोणे अशी या दोघांची नावं आहेत. या दोघांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती. शिंदे गटाने तिकीट नाकारल्यानंतर मधुर म्हात्रे यांनी ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत विजय मिळवला होता. मात्र, निकाल लागल्यानंतर मधुर म्हात्रे यांनी श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर हे दोन्ही नगरसेवक गायब झाले. ठाकरे गटाचे कार्यकर्ते-पदाधिकारी त्यांच्या घरीही गेले होते. मात्र, हे दोघेही न भेटल्याने त्यांच्या घराबाहेरच्या भिंतीवर पक्षाच्या बैठकीची नोटीस लावण्यात आली. दरम्यान, बुधवारी शिंदे गटाचे विधानसभा संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांनी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांची भेट घेतली होती. ही भेट कौटुंबिक स्वरुपाचे असल्याने शरद पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते. मात्र, या सगळ्याची राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा रंगली होती.

आणखी वाचा

कल्याणमध्ये मोठा ट्विस्ट, दोन्ही शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची भेट; नॉट रिचेबल नगरसेवकांवरही कारवाई सुरू