Kagal Nagarparishad Election 2025: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात कागल नगरपरिषदेतील हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे या दोन कट्टर वैऱ्यांच्या युतीची जोरदार चर्चा सुरु आहे. यानिमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) एकत्रही आल्या आहेत. महायुतीचा धर्म मोडून हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि समरजीत घाटगे (Samarjit Ghatge) यांनी कागलमध्ये केलेली ही युती शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. मी कागलमध्ये एकटा पडलेलो नाही. येथील जनता माझ्यासोबत आहे, असे संजय मंडलिक यांनी सांगितले. ते मंगळवारी कोल्हापूर येथे 'एबीपी माझा'शी बोलत होते. (Kolhapur News)
कागलच्या राजकारणात हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांन संजय मंडलिक यांना एकटे पाडल्याची चर्चा रंगली आहे. याविषयी विचारले असता संजय मंडलिक यांनी म्हटले की, शिवसेना हा महायुतीचा प्रमुख घटक आहे. आम्ही आमचे उमेदवारही रिंगणात उतरवले आहेत. समरजीत घाटगे आणि माझ्या कार्यकर्त्यांची स्थानिक स्तरावर केवळ प्राथमिक चर्चा झाली होती. आमच्या दोघांची थेट चर्चा झाली नव्हती. आता नेते इकडे-तिकडे गेले तरी जनता हा वेगळा घटक आहे. काही ठिकाणी अशी चर्चा रंगलेय की, संजय मंडलिकला एकटं पाडलं. पण मी एकटा नाही, जनता माझ्यासोबत आहे. लोकसभा निवडणुकीला समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ यांनी मला फसवले. कागलमध्ये भाजपने अद्याप उमेदवारांना एबी फॉर्म दिलेले नाही. त्यामुळे कागलमधील भाजप हसन मुश्रीफ यांच्यासोबत असल्याचे दिसते, असे संजय मंडलिक यांनी म्हटले.
कागलच्या जनतेला सोबत घेऊन मी पुढे जाणार आहे. कागलला राजकीय विद्यापीठ म्हटले जाते. कागलमध्ये मुश्रीफ-घाटगे यांची युती अनपेक्षित नाही. माझी आणि समरजित घाटगे यांची बोलणी झालेली नाहीत. विधानसभेला मी त्यांना मदत केली नाही असं म्हटलं जातं, मग आम्ही नोटाला मतं दिली का? उलट मला या दोन्ही नेत्यांनी लोकसभेला फसवलं आहे, असा आरोप संजय मंडलिक यांनी केला. यावर आता समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ काही प्रत्युत्तर देणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Kolhapur News: कागलमध्ये नेमकं काय घडलं?
कागल नगरपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि छत्रपती राजर्षी शाहू आघाडी यांची युती झाली आहे. हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगेंच्या यांच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला होता. हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून प्रचंड संघर्ष आहे. मात्र, भाजपच्या एका नेत्याने कागल नगरपरिषदेसाठी या दोघांमध्ये समेट घडवून आणल्याची चर्चा आहे. त्यामुळे समरजित घाटगे कागल नगरपरिषदेत शरद पवार गटाकडून न लढता राजर्षी शाहू आघाडीमार्फत लढणार आहेत.
आणखी वाचा
