नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विषयक सुविधांच्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे नाव निमंत्रण पत्रिकेतून वगळण्यात आल्यामुळे शिवसैनिक कमालीचे आक्रमक झाले आहेत. आज महापालिकेच्या विविध आरोग्य प्रकल्पांचा उद्घाटन सोहळा वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे ठाणे जिल्ह्याचे तर गणेश नाईक (Ganesh Naik) हे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत; तरीही नवी मुंबईतील कार्यक्रमाचे उद्घाटन नाईक यांच्या हस्ते सुरू असल्याने वाद पेटला आहे. एकीकडे कार्यक्रमस्थळी गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्या उपस्थितीत सोहळा सुरू असताना, बाहेर मात्र संतप्त शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत जोरदार आंदोलन सुरू केले होते, याप्रकरणी शिवसेना खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी गणेश नाईक यांच्यावर घणाघात केला आहे.

शिवसेना खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी गणेश नाईक यांच्यावर हल्लाबोल करत म्हटलं आहे की, जे लोक स्वतःच्या रक्ताला स्वतःचे नाव देऊ शकत नाहीत, ते काय कोणाचे नाव पुसणार? निमंत्रण पत्रिकेच्या कागदावर नाव वगळू शकाल, पण लोकांच्या काळजावर कोरलेले नाव कसे वगळाल? गणेश नाईक, तुम्ही महिलांचे शोषण करून आणि नवी मुंबईचे डोंगर पोखरून बदनाम झालात. आम्ही चांगले नाव कमावले तर तुमची जळणारच; तुम जलन बरकरार रखना, हम जलवा बरकरार रखेंगे! अशा शब्दात ज्योती वाघमारेंनी गणेश नाईकांना डिवचलं आहे.

Jyoti Waghmare : "कोट्यवधी लोकांच्या काळजावर कोरलेलं नाव कसं पुसणार?"

ज्योती वाघमारे म्हणाल्या, "नवी मुंबईच्या कार्यक्रम पत्रिकेमधून पुन्हा एकदा सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं नाव वगळलं गेलं. जे लोक स्वतःच्या रक्ताला स्वतःचं नाव नाही देऊ शकले, ते लोक काय आमचं नाव वगळणार? तुम्ही निमंत्रण पत्रिकेच्या कागदावरचं नाव पुसू शकाल, परंतु स्वतःच्या कामानं कोट्यवधी लोकांच्या काळजावरती जे नाव कोरलं गेलेलं आहे, ते तुम्ही कसं पुसणार?"

Jyoti Waghmare : "ही त्यांच्या चिंधी मानसिकतेचे पुरावे आहेत"

गणेश नाईक यांचे नाव न घेता त्यांच्यावर वैयक्तिक आणि राजकीय टोला लगावताना वाघमारे म्हणाल्या, "एखाद्या व्यक्तीची जलन, ईर्ष्या, द्वेष आणि कोती मनोवृत्ती यातून हे प्रकार घडतायत. हे त्यांच्या चिंधी मानसिकतेचे पुरावे आहेत." "तुम्ही आतापर्यंत काय नाव कमावलंत? कधी महिलांचं शोषण करून, कधी नवी मुंबईचे डोंगर पोखरून, कधी तुमची घराणेशाही आणि हुकूमशाही लोकांवरती लादून, तर कधी स्वतःच्या संपत्तीचं निलाजरे प्रदर्शन करत 'व्हाईट हाऊस' बांधून तुम्ही फक्त बदनाम होण्याचीच कामं केलीत, नाव कमावणं काय असतं किंवा जनतेचा आशीर्वाद घेणं काय असतं, हे तुम्हाला काय कळणार?" अशी बोचरी टीका त्यांनी केली.

Jyoti Waghmare : "नाव न घातल्याने कोणाचे कर्तृत्व कमी होत नाही"

त्यांनी पुढे म्हटले की, "अहो, तुम्ही तर आतापर्यंत अशीच कामं केलीत की ज्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. मग कोणता माज आहे हो तुम्हाला? त्यामुळे, अशा प्रकारे निमंत्रण पत्रिकेवरती नाव न घातल्यामुळे कोणाच्याही कर्तृत्वाची उंची कमी होत नसते. त्यावरून तुमच्यासारख्या सत्तांध आणि मदांध लोकांच्या कोत्या आणि विकृत मानसिकतेचं प्रदर्शन होत असतं."

Jyoti Waghmare : 'तुम जलन बरकरार रखना...'

शेवटी सर्व शिवसैनिकांच्या वतीने त्यांनी हिंदीत एक शायरी म्हणत गणेश नाईक यांना थेट इशारा दिला, "तुम जलन बरकरार रखना, एकनाथजी शिंदे साहेब अपने काम के जलवे बरकरार रखेंगे।"