Jaykumar Gore on Dhairyasheel Mohite Patil: जिल्हा परिषद (ZP Election 2026) आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय संघर्ष चांगलाच टोकाला गेला असून, भाजप आणि मोहिते पाटील गटातील वाद आता जाहीर सभांमधून उफाळून येऊ लागला आहे. पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील कासेगाव येथे झालेल्या जाहीर सभेत पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांच्यावर सडकून टीका करत थेट इशाराच दिला आहे.
सभेत बोलताना जयकुमार गोरे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडचणीच्या काळात मोहिते पाटील यांना छत दिलं. संपत चाललेल्या पश्चिम महाराष्ट्रातील एका घराण्याला ताकद दिली. आणि आज तेच मोहिते पाटील त्यांच्या विरोधात बोलत आहेत, नाचत आहेत,” अशा शब्दांत त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना टोला लगावला. फडणवीस यांनी छत काढले तर कारखान्याच्या गव्हाण बंद पडतील, आता इशारा देखील त्यांनी दिला.
Jaykumar Gore on Dhairyasheel Mohite Patil: हत्तीने सोंड फिरवली, तर...
यावेळी त्यांनी आक्रमक शैलीत इशारा देत म्हटलं, “हत्ती बाजारातून जाताना कुत्री भुंकत असतात. हत्ती त्याकडे लक्ष देत नाही. पण हत्तीने एकदा सोंड फिरवली, तर काय होईल याचा विचार करा,” असा थेट आणि सूचक इशारा जयकुमार गोरे यांनी दिला.
Jaykumar Gore on Dhairyasheel Mohite Patil: आमच्याकडे विकासकामांचा अजेंडा
इतक्यावर न थांबता, गोरे यांनी मोहिते पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटलं की, “अनेकांचे संसार देशोधडीला लावले, बँका बुडवल्या, इतकी पापं केली आहेत. पण तुमच्यावर टीका करून आम्हाला निवडणूक जिंकायची नाही. आमच्याकडे विकासकामांचा अजेंडा आहे. मात्र तुम्ही मर्यादेत रहा,” असा स्पष्ट संदेशही त्यांनी दिला.
Jaykumar Gore on Dhairyasheel Mohite Patil: राजकीय वातावरण तापले
दरम्यान, सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहिते पाटील आणि भाजप यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी विविध सभांमधून भाजपचा “सुपडा साफ करू” अशी भाषा वापरल्याने राजकीय वातावरण तापले आहे. त्याच वक्तव्यांचा समाचार घेत जयकुमार गोरे यांनी कासेगावच्या सभेत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या आक्रमक वक्तव्यामुळे सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
