Lalit Kolhe Jalgaon Crime: बनावट कॉल सेंटर चालवल्याच्या आरोपाखाली गेल्या सात महिन्यांपासून नाशिक (Nashik) येथील कारागृहात असलेले जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे (Lalit Kolhe) यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) जामीन मंजूर केला आहे. ललित कोल्हे यांचे पुत्र आणि नगरसेवक पीयुष कोल्हे यांनी यासंदर्भात माहिती दिली असून, कोल्हे कुटुंबासाठी हा मोठा कायदेशीर विजय मानला जात आहे.
Lalit Kolhe: काय आहे प्रकरण?
तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांना जळगाव शहरालगतच्या ममुराबाद रस्त्यावर असलेल्या माजी महापौर कोल्हे यांच्या फार्महाऊसवर बोगस कॉल सेंटर चालविले जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे 28 सप्टेंबर रोजी एल. के. फार्महाऊसवर छापा टाकण्यात आला.
या कारवाईदरम्यान पोलिसांना एकूण 31 लॅपटॉप तसेच कॉल सेंटर चालविण्यासाठी वापरली जाणारी अत्याधुनिक उपकरणे मोठ्या प्रमाणात आढळली. प्राथमिक चौकशीत हे कॉल सेंटर परदेशी नागरिकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले.
कॉल सेंटरमधील कर्मचारी स्वतःला अधिकृत प्रतिनिधी असल्याचे भासवून विविध ऑफर्स, डेटाची पडताळणी किंवा सेवांच्या नावाखाली विदेशी नागरिकांकडून पैसे उकळत होते. याशिवाय, दोन लॅपटॉपमध्ये झालेल्या आर्थिक व्यवहारांचे ठोस पुरावेही पोलिसांच्या हाती लागले होते. याप्रकरणी पोलिसांनी (Police) ललित कोल्हे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. तेव्हापासून कोल्हे हे नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते.
Lalit Kolhe: कारागृहात असतानाच मिळवला विजय
विशेष म्हणजे, ललित कोल्हे हे कारागृहात असतानाच जळगाव महानगरपालिकेची निवडणूक पार पडली. त्यांनी शिवसेना शिंदे गटाकडून ही निवडणूक लढवली आणि मोठ्या मताधिक्याने विजयही संपादन केला. मात्र, जामीन मिळत नसल्याने त्यांच्या परिवारासह समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. त्यांच्या सुटकेसाठी कोल्हे कुटुंबाने सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र तिथून दिलासा न मिळाल्याने अखेर सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.
Lalit Kolhe: सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान ललित कोल्हे यांना जामीन मंजूर करण्यात आला. पीयुष कोल्हे यांनी या बातमीला दुजोरा दिला असला तरी, जोपर्यंत न्यायालयाच्या आदेशाची अधिकृत प्रत हातात पडत नाही, तोपर्यंत कॅमेरासमोर कोणतीही सविस्तर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी तुर्तास नकार दिला आहे. ललित कोल्हे यांच्या जामिनामुळे जळगावच्या स्थानिक राजकारणात आता पुन्हा एकदा मोठ्या हालचाली होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आणखी वाचा
