Diva Ratnagiri passenger: मुंबईतून कोकणात जाणाऱ्या सामान्य चाकरमान्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेली रत्नागिरी-दादर पॅसेंजर ट्रेन पुन्हा सुरु करण्यासाठी आता राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) आक्रमक भूमिका घेतली आहे. यापूर्वी कोकणात जाणारी ही पॅसेंजर ट्रेन दादर ते रत्नागिरी (Diva Ratnagiri Passenger Train) अशी चालवली जायची. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे खात्याने कोणतेही कारण न देता ही एक्सप्रेस ट्रेन फक्त दिव्यापर्यंतच चालवण्याचा निर्णय परस्पर घेतला होता. यामुळे कोकणात जाणाऱ्या अनेक प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते. त्यामुळे आता मनसेने ही पॅसेंजर ट्रेन दिवा स्थानकात न थांबता पूर्वीप्रमाणे दादर स्थानकापर्यंत चालवण्यात यावी, यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या 15 ते 20 दिवसांमध्ये दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनबाबतची आमची मागणी मान्य झाली नाही तर आम्ही उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेन रोखून धरु, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Railway news)

Continues below advertisement

मनसेच्या नेत्यांनी या मुद्द्यावरुन सध्या आक्रमक भूमिका घेतली आहे. दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन ही कोरोनाच्या काळात बंद करण्यात आली होती. ती नंतर सुरु करण्यात आली. मात्र, तेव्हापासून ही गाडी फक्त दिवा स्थानकापर्यंतच चालवली जात आहे. दादर स्थानकापर्यंत ही गाडी सुरु करण्यास रेल्वे विभागाने नकार दिला होता. वारंवार मागणी करुनही रेल्वे विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. ही गाडी पकडण्यासाठी दिवा स्थानकात जावे लागत असल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते. हे मनसेला मान्य नाही. मनसे कोकणवासियांची गैरसोय होऊन देणार नाही. यावर मार्ग काढला नाही तर रेल्वेला मनसे स्टाईल उत्तर दिले जाईल, असा इशारा मनसेच्या नितीन सरदेसाई यांनी दिला. 

कोकण रेल्वेसाठी आम्ही आमची जमीन दिली आणि आता हे असे करत आहेत. त्यांचे म्हणणे असे आहे की, पॅसेंजर ट्रेन दादरपर्यंत चालवल्यास लोकलच्या वेळापत्रकात गैरसोय होते. ही गाडी रद्द होऊ नये, असे आम्ही त्यांना सांगितले आहे. कोकणवासीयांसाठी आम्ही लढत राहू जर.  मान्य नाही झाले तर मनसे स्टाइल उत्तर द्यावे लागेल. गेले 25 वर्षे मुंबई गोवा महामार्गाबाबत बोलले जात आहे. रस्त्याने प्रवास करायचा म्हटला की हाल होतात. कोकणवासीय सहनशील असले तरी किती अन्याय सहन करायचा? तुम्ही रो-रो सेवा सुरू करत आहात, मग रत्नागिरी-दिवा पॅसेंजर रेल्वेबद्दल  का बोलत नाही ? महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी काय करत आहेत, हे मुद्दे संसदेत का मांडत नाही, असा सवाल नितीन सरदेसाई यांनी उपस्थित केला.

Continues below advertisement