Kolhapur ZP Election 2026: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या (ZP Election 2026) तोंडावर कागल तालुक्यात मोठ्याप्रमाणावर बंडखोरीचे पेव फुटले आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ आक्रमक होताना दिसले. जिल्हा परिषदेमध्ये बंडखोरी करून आम्हाला जे सोडून गेलेत त्यांची आणि आमची भेट आता स्वर्गातच, असा निर्वाणीचा इशाराच त्यांनी दिला आहे. ते शुक्रवारी कोल्हापूरमधील प्रचारसभेत बोलत होते. (Kolhapur news in Marathi)

या सभेत हसन मुश्रीफ यांनी बंडखोरांना स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्या वाक्याची आठवण करुन दिली. कार्यकर्त्यांनो तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला तिन्ही नेत्यांना पुन्हा तोंड दाखवायचे आहे. काम करुन घेण्यासाठी, विकासासाठी तुम्हाला याच नेत्यांना तोंड दाखवायचे आहे. माझा बुथ सब से मजबूत, हे दाखवण्याची हीच संधी आहे. आता कोणीही तक्रार करायची नाही. तिघांचा मिळून मंडप आहे. तिघांची मुलं नवरे आहेत, तिघांच्या मुली मंडपात आहेत, आता तिघांनी मिळून कष्ट करायचे आहेत. कुठलंही किल्मिष मनात ठेवायचे नाही, असे आवाहन हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केले. 

आम्ही तिघे एकत्र आलो आहोत. कुणाला एकटं पाडण्यासाठी किंवा एकटं ठेवण्यासाठी आम्ही हे केलेले नाही. आमची इच्छा होती, त्यांनी आमच्याकडे यावे. आपल्याला भविष्यात सुद्धा अशाचप्रकारे काम करावे लागेल. पण काहीजण 'धूळ चेहऱ्यावर आणि ते आरसा साफ करत राहिले', अशी खोचक टिप्पणी करत हसन मुश्रीफ यांनी संजय मंडलिक यांना लक्ष्य केले. 

Samarjitsinh Ghatge in Kolhapur: कोणतीही बंडखोरी खपवून घेणार नाही: समरजितसिंह घाटगे

या प्रचारसभेत समरजितसिंह घाटगे यांनीही पक्षातील बंडखोरांना इशारा दिला. आमच्यामध्ये बंडखोरी करून पलीकडच्या बाजूला गेलेल्या उमेदवारांना सांगतो, रेकॉर्ड ब्रेकने तुम्हाला पाडणार. कोणतीही बंडखोरी खपवून घेणार नाही. ज्यांनी बंडखोरी करून पक्ष किंवा गट सोडला त्यांना परत घेतलं जाणार नाही. ज्यांनी अपक्ष फॉर्म भरले आहेत, त्यांनी माघार घेऊन या प्रवाहामध्ये आमच्या सोबत यावे, असे समरजितसिंह घाटगे यांनी म्हटले.

आणखी वाचा

कोल्हापुरात झेडपी अन् पंचायत समितीला करवीर तालुक्यात सर्वाधिक चुरस; राधानगरी दुसऱ्या क्रमांकावर