Harshwardhan Sapkal: हर्षवर्धन सपकाळांच्या 'त्या' विधानावरून राज्यभरात टीकेचा उद्रेक, निवास्थानी शिवप्रेमींकडून धमकी, काँग्रेसकडून मात्र प्रदेशाध्यक्षांना भक्कम साथ
Harshwardhan Sapkal : प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या टिपू सुलतानवरील वक्तव्यावरून भाजपने राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केलंय. तर दुसरीकडे राजकारणातही त्याचे पडसाद उमटत असल्याचे चित्र आहे.

Harshwardhan Sapkal Congress on Tipu Sultan : ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला, अगदी त्याचप्रमाणे टिपू सुलतान यांनी त्याच समकक्ष काम केले आहे. त्यामुळे टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) समकक्ष मानले गेले पाहिजे, असे वक्तव्य काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी केलं होतं. सपकाळ यांच्या या वक्तव्यावरून भाजपने राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केलंय. तर दुसरीकडे राज्याच्या राजकारणातही त्याचे पडसाद उमटत असल्याचे चित्र आहे.
असे असताना, दुसरीकडे हर्षवर्धन सपकाळ यांच्या समर्थनार्थ काँग्रेस पक्ष मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या पाठीशी उभे राहिले असल्याचे चित्र आहे. मुंबईच्या टिळक भवन येथे हर्षवर्धन सपकाळ आल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आलाय. एकीकडे भाजपकडून राज्यभर आंदोलन केले जात असताना मुंबईतील काँग्रेस पदाधिकारी मात्र हर्षवर्धन सपकाळ यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्याचे चित्र आहे.
Buldhana News : हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवासस्थानी मध्यरात्री जात शिवभक्तांनी दिलं आव्हान
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केल्यानंतर राज्यात गदारोळ माजला आहे. अनेक शिवभक्तांनी हर्षवर्धन सपकाळ यांना फोनवरून तुमचा दाभोळकर करू... अशा धमक्या दिल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. तर मध्यरात्री बुलढाण्यातील त्यांच्या निवासस्थानासमोर सचिन पाटील नामक शिवभक्ताने त्यांना खुलं आव्हान देत, "हर्षवर्धन सपकाळ माफी मागा, नाहीतर तुम्हाला महाराष्ट्रात फिरू दिल जाणार नाही आणि तुमचं तोंड काळ करू...!" अशा आशयाचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ हर्षवर्धन सपकाळ यांच्या बुलढाण्यातील निवासस्थानासमोरून तयार करण्यात आलेला आहे. यामुळे मात्र बुलढाण्यात खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मालेगावच्या उपमहापौरांच्या कक्षात टिपू सुलतानाचा फोटो लावण्यात आला होता. या फोटोला हिंदुत्ववादी संघटनांनी प्रखर विरोध केलेला. या विषयावर जेव्हा हर्षवर्धन सपकाळ यांना प्रश्न केला गेला त्यावेळी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, "शिवाजी महाराजांचे शौर्य ज्या पद्धतीचे आहे, स्वराज्य नावाचा ज्या पद्धतीने त्यांनी विचार केला, त्याच मांदळी मध्ये त्यांच्यावर बराच काळ लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला होता. त्या अर्थाने टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे योद्धे होऊन गेले. भारताचे भूमिपुत्र झाले. कुठल्याही विकारी विषारी विचारांना त्यांनी जवळ केले नाही. शौर्याचे लक्षण म्हणून टिपू सुलतान यांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितले पाहिजे' असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर होऊन मोठा गदारोळ उडाला.
























