मोठी बातमी! भिवंडीत काँग्रेसकडून भाजपचा गेम, मोठा गट फुटला; महापौर अन् उपमहापौरपदाची नावं ठरली
जोपर्यंत संख्याबळ नाही, तोपर्यंत निवडणूक लावली जात नाही, भिवंडीत ही असंच पाहायला मिळालं. भिवंडीत आम्ही निवडणुकांना सामोरे गेलो, येथे सर्वाधिक जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत.

ठाणे : राज्यातील महापालिका निवडणुकानंतर महापालिकेतील महापौरपदाच्या (Mayor) निवडीही संपन्न झाल्या असून कामकाजही सुरू झाल्याचं दिसून येत आहे. चंद्रपूर आणि परभणी महापालिकेतील संख्याबळामुळे राज्याचं लक्ष तिकडे लागलं होतं. त्यानंतर, अद्यापही महापौर निवड न झालेल्या भिवंडी (Bhiwandi) महापालिकेत मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळत आहे. तेथील भाजपचे महापौरपदाचे उमेदवार एकनाथ चौधरी यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसोबत हातमिळवणी केल्याने तेथील राजकीय चित्र बदलले आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan sapkal) आणि भिवंडीचे खासदार बाळ्या मामा यांनी महापौरपदाच्या निवडीबाबत माहिती दिली.
जोपर्यंत संख्याबळ नाही, तोपर्यंत निवडणूक लावली जात नाही, भिवंडीत ही असंच पाहायला मिळालं. भिवंडीत आम्ही निवडणुकांना सामोरे गेलो, येथे सर्वाधिक जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. बहुमतासाठी 16 जागा आम्हाला कमी पडल्या, तिथे आम्ही सेक्युलर फ्रंट सुरू केली. त्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 नगरसेवक आले आहेत. त्यामुळे, आमची संख्या 42 झाली, याशिवाय अपक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला, मात्र कोंडी फुटत नव्हती, अशी माहिती सपकाळ यांनी दिली.
आम्ही भाजप आणि शिंदेसेना यांचा पाठिंबा घेणार नाही ही आमची भूमिका होती. भाजप सोडून जर कोणी येत असेल तर आम्ही चर्चा करायला तयार आहोत, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले. नारायण चौधरी हे आधी कांग्रेस पक्षाचे होते, ते निवडणुकांपूर्वी भाजपमध्ये गेले होते. पण, आता ते सेक्युलर फ्रंटमध्ये आले आहेत, 9 नगरसेवकांना घेऊन ते आले आहेत. यात कोणाचा अर्ज ठेवायचा यावर आम्ही निर्णय घेऊ, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. नारायण चौधरी यांनी महापौरपदासाठी अर्ज भरला आहे, तर आमच्याकडून तारक अन्वर यांनी अर्ज भरला आहे. नारायण चौधरी यांनी भाजप सोडलेली आहे, असेही सपकाळ यांनी सांगितले. त्यामुळे, भिंवडीत महापौर कोण होणार हे उद्याच स्पष्ट होईल.
काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र
महापौर काँग्रेसचा आणि समाजवादीचा उपमहापौर असं सांगितलं होत. विलास पाटील आले तर त्यांनाही आम्ही उपमहापौर देण्यास तयार होतो, आम्ही त्यांचा मानसन्मान करायला तयार होतो. जनतेचं स्पष्ट कौल असताना 25 प्रश्न प्रलंबित होते. मात्र, आम्ही निर्णय घेतला आहे. तांत्रिक बाबी आहेत, त्यामुळे गट स्थापन केला किंवा काय हे उद्या समजेल, असे खासदार बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे यांनी म्हटलं. एक गट फुटला एवढंच आता स्पष्ट आहे, असेही बाळ्या मामा यांनी म्हटले.
काँग्रेसकडून एकनाथ चौधरींना महापौरपदाची संधी?
दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपाचे उमेदवार एकनाथ चौधरी व त्यांचे सहकारी मिळून महापौर पदासाठी बहुमताचा आकडा गाठता येतो. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून आज व्हिप जारी केला आहे. ज्यामध्ये एकनाथ चौधरी यांना महापौर तर काँग्रेसचे तारीक मोमीन यांना उपमहापौर पदासाठी मतदान करण्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, भाजपच्या व्हिपच्या विरोधात जर मतदान झाले तर भाजपाकडून विरोधात मतदान करणार्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
भिंवडीत संख्याबळ कसं?
भिवंडी महापालिका महापौर व उपमहापौर पदाची निवड 20 फेब्रुवारी रोजी होणार आहे . महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे 30,भाजपा 22, राष्ट्रवादी 12 शिवसेना 12, समाजवादी 6, कोणार्क विकास आघाडी 4, भिवंडी विकास आघाडी 3 अपक्ष 1 असे संख्याबळ आहे.
























