Harshvardhan Sapkal: चंद्रपूरमध्ये ठाकरेंची भाजपला साथ, हर्षवर्धन सपकाळांचा निर्वाणीचा इशारा, दिल्लीतून हायकमांडचं तातडीचं बोलावणं
Harshvardhan Sapkal on Chandrapur Mayor Election 2026: चंद्रपूर महानगरपालिकेत शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोबत घेत भाजपने सत्ता स्थापन केली आहे.

Harshvardhan Sapkal on Chandrapur Mayor Election 2026: चंद्रपूर महानगरपालिकेतील (Chandrapur Municipal Corporation) सत्तानाट्याचा अखेर मंगळवारी नाट्यमय शेवट झाला. शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (Shiv Sena UBT) सोबत घेत भाजपने (BJP) राजकीय चमत्कार घडवत चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापन केली आहे. अवघ्या एका मताच्या फरकाने भाजपच्या संगीता खांडेकर यांनी महापौरपदाची निवडणूक जिंकली आहे. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत ईश्वर चिठ्ठीद्वारे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार प्रशांत दानव विजयी झाले आहेत. यामुळे काँग्रेसला (Congress) मोठा राजकीय धक्का बसला आहे. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी ठाकरेंना थेट निर्वाणीचा इशारा दिलाय. तर काँग्रेस हायकमांडकडून हर्षवर्धन सपकाळ यांनी तातडीने दिल्लीला बोलावण्यात आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Harshvardhan Sapkal on Chandrapur Mayor Election 2026: चंद्रपुरात मोठा घोडेबाजार झालाय
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, चंद्रपुरात नक्कीच मोठा घोडेबाजार झाला आहे. सुधीर मुनगंटीवार यांचा 1000 कोटीचा बंगला हा चर्चेचा विषय आहे. महापौर बनवण्याकरता त्यांनी तेवढेच पत्ते विकत घेतलेले आहेत. यात मोठा घोडेबाजार झालेला आहे. अशा स्थितीत वंचित बहुजन आघाडी आमच्यासोबत असायला हवी होती, हे तेवढेच खरं आहे. चंद्रपूरच्या दोन्ही नेत्यांना आम्ही एकत्रित येण्यासाठी पुढाकार घेतला. आमच्या पक्षात कुठेही फाटाफूट झाली नाही. यात उबाठाने भाजपला पाठिंबा दिला. सुधीर मुनगंटीवार यांनी जसा बंगला बांधला, तशाच पद्धतीने आज त्यांनी महापौर बसवला आहे, असा आरोप त्यांनी केलाय.
Harshvardhan Sapkal on Chandrapur Mayor Election 2026: परभणीत आम्ही आमच्या सोयीने वागायचं का?
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, नेमकं काय झालं याबाबत निरीक्षकाकडून मी अहवाल मागवला आहे. आमच्या पक्षात कुठेही गटबाजी नाही. वास्तविकता ठाकरेंची शिवसेना ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा भाग आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसला पाठिंबा देणे अभिप्रेत होतं. मात्र, तसं झालं नाही. याचे परिणाम निश्चितपणे महाराष्ट्रभर उमटल्याशिवाय राहणार नाही. वंचित आणि ठाकरे गटाचे मतदान आम्हाला मिळू शकलं नाही, याबद्दल मी चिंता व्यक्त करतो. ठाकरे गट आमच्यासोबत चंद्रपूरला आला नाही तर परभणीत आम्ही आमच्या सोयीने वागायचं का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर, महाविकास आघाडी सध्या संक्रमण परिस्थितीतून जात असल्याचे देखील हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
Harshvardhan Sapkal: दिल्लीतून हायकमांडचं तातडीचं बोलावणं
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना तातडीने दिल्लीत बोलावल्याची माहिती समोर येत आहे. पक्षश्रेष्ठींनी हर्षवर्धन सपकाळ यांना दिल्लीत बोलावल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. हर्षवर्धन सपकाळ तात्काळ बुलढाण्याहून दिल्लीसाठी रवाना देखील झाले आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांनी दिल्लीत हायकमांडशी काय चर्चा होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा

























