Harshavardhan Sapkal: देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रात दंगली घडवायच्यात, 'ध' चा 'मा' करून माझ्या वक्तव्याची मोडतोड केली; पुण्यातील भाजपच्या राड्यानंतर हर्षवर्धन सपकाळ संतापले
Harshavardhan Sapkal on Pune BJP Congress Rada: पुण्यात हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपकडून आंदोलन सुरू असतानाच भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला.

Harshavardhan Sapkal on Pune BJP Congress Rada: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि टिपू सुलतानची (Tipu Sultan) तुलना केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वक्तव्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपकाळ यांच्यावर जोरदार शब्दांत टीका केली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना करून मुघलांच्या जोखडातून सामान्य माणसाला मुक्त केले. खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य उभे करणारे शिवरायच होते. दुसरीकडे हजारो-लाखो हिंदूंची हत्या करणाऱ्या टिपू सुलतान यांची तुलना शिवरायांशी करून दोघांनाही समान सन्मान देण्याची मागणी करणे म्हणजे याहून मोठे लांगुलचालन आणि जोडे चाटण्याचे उदाहरण असू शकत नाही. आम्ही हे सहन करणार नाही, असे फडणवीसांनी म्हटले. या पार्श्वभूमीवर आज पुण्यात सपकाळ यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपकडून आंदोलन सुरू असतानाच भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. या घटनेनंतर हर्षवर्धन सपकाळ चांगलेच संतापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Harshavardhan Sapkal on Pune BJP Congress Rada: नेमकं काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ एक्सवर पोस्ट करत म्हणाले की, माझ्या वक्तव्याची मोडतोड करून "ध" चा "मा" करून देवेंद्र फडणवीसांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत, असे मी सांगितले होते. त्याचा प्रत्यय आज पुण्यात आला. पुण्यातील भाजपचे गुंड पुणे काँग्रेसच्या कार्यालयावर चाल करून आले व त्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत दगडफेक करत काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांसह पत्रकार भगिनींवर प्राणघातक हल्ला केला. भाजपच्या या गुंडगिरीचा आम्ही तीव्र निषेध करतो. पुणे पोलिसांनी दंगेखोर भाजप गुंडाना चिथावणी देणाऱ्या धीरज घाटे आणि महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह भाजपच्या दंगेखोरांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
माझ्या वक्तव्याची मोडतोड करून "ध" चा "मा" करून देवेंद्र फडणविसांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत असे मी सांगितले होते, त्याचा प्रत्यय आज पुण्यात आला.
— Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) February 15, 2026
पुण्यातील भाजपचे गुंड पुणे काँग्रेसच्या कार्यालयावर चाल करून आले व त्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत दगडफेक करत काँग्रेसच्या महिला…
Pune BJP Congress Rada: पुण्यात भाजप अन् काँग्रेसमध्ये जोरदार राडा
दरम्यान, हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याविरोधात पुण्यामध्ये भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. भाजप कार्यकर्त्यांकडून पुण्यात काँग्रेस भवनासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी सुरू असतानाच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वादाचे रूपांतर थेट दगडफेकीत झाले. आंदोलकांकडून झालेल्या दगडफेकीत काही कारच्या काचा फुटल्या असून एका काँग्रेस कार्यकर्त्याच्या डोक्याला दगड लागल्याने तो गंभीर जखमी झाला. यावेळी पोलिसांना देखील दगड लागल्याची माहिती आहे. तर काँग्रेसकडून भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटेंना अटक करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. काँग्रेस नेते प्रशांत जगताप यांनी पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या उपस्थितीत आमच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला. काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांची डोकी फोडण्यात आली. महापौर फक्त तमाशा बघत होत्या, पोलिसांनाही बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप केलाय.
आणखी वाचा
























