Haribhau Rathod : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservaion) पार्श्वभूमीवर हैदराबाद गॅझेट, कुणबी प्रमाणपत्र, तसेच बंजारा समाजाचे प्रश्न या मुद्द्यांवरून ज्येष्ठ ओबीसी नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनी राज्य सरकारवर, तसेच मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मराठा समाजापेक्षा बंजारा समाजाची मोठी ताकद, मराठवाड्यात बंजारा समाजाविना निवडणूक जिंकून दाखवा, असा इशाराच त्यांनी दिलाय.  

Continues below advertisement


हरिभाऊ राठोड म्हणाले की, हैदराबाद गॅझेट लावल्यामुळे मराठा समाजाला कुणबीचे दाखले मिळणार आहे. हैदराबाद गॅझेट लागू करा याचा अर्थ नोंदीचा विषय नाहीये. ते नोंदणी नाहीयेत ते पुरावा आहे. तो पुरावा कसला आहे तर मराठवाड्याचे मराठा हे कुणबी आहेत. त्यामुळे सरसकट होणार आहेत. आमची मूळ मागणी होती की, आम्हाला एसटीमध्ये द्या. अनेक वर्ष मी सांगत होतो एसटी ब द्या. कारण हैदराबाद गॅजेट आहे. आमच्या बंजारा समाज आंध्र आणि कर्नाटकामध्ये एसटीमध्ये आहे. हाच पुरावा नाहीये. द्विभाषिक राज्याची निर्मिती झाली. 1956 रोजी जो समाज तिथे होता सगळे महाराष्ट्र द्यायला तयार नव्हते. बंजारा समाजाचा विरोध होता. कारण तिथे आम्हाला सवलती मिळत होत्या. आमची मागणी होती की, आम्हाला तिथेच ठेवा. परंतु सरकारने निर्णय घेतला आणि द्विभाषिक राज्याची निर्मिती झाली.


मराठा समाजापेक्षा बंजारा समाजाची मोठी ताकद


तिसरा महत्त्वाचा पुरावा बाबासाहेब आंबेडकर यांची संविधानामध्ये एसटीची लिस्ट आहे. उत्तर भारतात आम्हाला बंजारा नाही म्हणत नाही. वसंतराव नाईक हेदेखील बंजारा होते. नाईक ही पदवी आहे तो समाज म्हणून पण ओळखला जातो. शेड्युल ट्राईबच्या लिस्टमध्ये आम्ही अजून देखील आहोत. मंडल आयोगाने पण सांगितलं की, या समाजाला आम्ही ओबीसीमध्ये ठेवतो. पण, हा समाज शेडूल ट्राईब आणि शेड्युल कास्टचा दर्जा प्राप्त करतोय. म्हणून कर्नाटकात आम्ही कास्टमध्ये आहोत. बिहारमध्ये आम्ही शेडूल ट्राईबमध्ये आहोत. शासनाने लवकरात लवकर आमचा समाज शेड्युल ट्राईबमध्ये असल्याचा जीआर काढला पाहिजे. आम्हाला अनेक ठिकाणाहून पाठिंबा येतोय. मराठवाड्यात एका खासदाराने बंजारा समाजाविना निवडणूक लढवून दाखवावी आणि विजयी होऊन दाखवावं, मराठा समाजापेक्षा बंजारा समाजाची मोठी ताकद आहे, असे हरिभाऊ राठोड यांनी म्हटले आहे. 


आम्ही ओबीसी येडे आहोत का?


हरिभाऊ राठोड पुढे म्हणाले की, सरकारला वाटत असेल की, आम्ही मराठा समाजाचा प्रश्न सोडवला आहे. पण हा प्रश्न चिघळलेला आहे. सरकारचे अधिकारी सरकारला माहिती देत नाहीयेत का? एकच समाज म्हणतोय हा जीआरबरोबर आहे. आम्ही ओबीसी येडे आहोत का?  सरसकटचा अर्थ काय आहे तर सगळ्यांना आहे. आपल्या महाराष्ट्रात 2004 साली असा एक जीआर काढला होता. एकतर कुणबी असला पाहिजे किंवा मराठा असला पाहिजे. आमच्या विदर्भात एकही मराठा शिल्लक नाही. मुख्यमंत्री चांगला माणूस आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यावर 435 पैकी 434 लोकं सोडलेत. माझी मुख्यमंत्री यांना विनंती आहे की, अशा लोकांना जवळ ठेवू नका. करपुरी ठाकूर फॉर्मुल्याचा अभ्यास करा.  रोहिणी आयोग का नेमला बघा जरा. वसंतराव साहेबांनी 1965 साली आरक्षण दिले. माझ्या फॉर्मुल्यामुळे अनेकांना आरक्षण मिळाले. आज पण प्रश्न मिटू शकतो फक्त मी जे सांगतो ते केलं पाहिजे, असे देखील त्यांनी म्हटले आहे. 


हरिभाऊ राठोडांची छगन भुजबळांवर टीका 


मराठा आरक्षणाच्या जीआरवरून मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत विचारले असता हरिभाऊ राठोड म्हणाले की,  भुजबळ साहेबांना मी हेच सांगत होतो. ही लोक घेतल्याशिवाय राहणार नाही. भुजबळ साहेब म्हणत होते, लोकशाही आहे जरांगेशाही नाही. अहो भुजबळसाहेब जरांगेशाही आली. आता तरी भुजबळ साहेबांनी अभ्यास केला पाहिजे. भुजबळ साहेब मी पंचवीस वर्ष ओबीसीचे नेतृत्व करतो. तुम्हाला भटके विमुक्त माहित नाही. भुजबळ साहेब तुम्ही देखील एकाच समाजाचे नेतृत्व करत आहे. माझा आरोप आहे की, भुजबळ साहेब हे एकाच समाजाचे नेतृत्व करतात. त्यांना बाकी समाजाची काहीच पडली नाही, असा म्हणत त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.



आणखी वाचा 


Maratha Reservation: तुम्हाला EWS, राज्याचं 10 टक्के आणि ओपनमधील 50 टक्के आरक्षण नको का? शिकलेल्या मराठ्यांनी उत्तर द्यावं, छगन भुजबळांचं आव्हान