Girish Mahajan on Uddhav Thackeray : महाराष्ट्रात महायुती सरकारकडून हिंदी सक्ती लादण्याचा प्रयत्न झाल्यानंतर राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली. या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संयुक्तपणे मोर्चा काढण्याचा इशारा दिला. परिणामी, अवघ्या काही दिवसांत सरकारला हिंदी सक्तीविषयक जीआर मागे घ्यावा लागला. याच पार्श्वभूमीवर काल (दि. 5 जुलै) वरळी डोममध्ये ‘विजय मेळावा’ पार पडला. सुमारे दोन दशकांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणांतून भाजपावर जोरदार टीका केली. आम्ही निवडणुकीसाठी नाही तर मराठीसाठी एकत्र आलो आहोत, असे ते म्हणाले. यानंतर आता भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी मोठा दावा केला आहे.  

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाला गळती सुरु असल्याची पाहायला मिळत आहे. अनेक नेते ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून भाजपमध्ये सामील होत आहेत. याच पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी मोठा दावा केला आहे. "आता उद्धव ठाकरे यांच्यावर कोणाचाही विश्वास उरलेला नाही. त्यामुळेच आजही उभाठाचे उरलेले आमदार आणि खासदार माझ्या संपर्कात आहेत. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्हाला हे थोड्याच कालावधीत दिसून येईल," असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. गिरीश महाजन यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

गिरीश महाजनांची उद्धव ठाकरेंवर टीका 

गिरीश महाजन यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, राज्यात हिंदी विषय लागू करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने घेतला होता. हा निर्णय मंत्रिमंडळात मान्य करण्यात आला होता आणि त्यावर त्यांच्या सह्याही आहेत. मात्र आता, हिंदी विषय सक्तीच्या मुद्द्यावर ते याच निर्णयाला विरोध करत असून, या बाबतीत त्यांनी पलटी घेतली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे "पलटीबहाद्दर" आहेत आणि त्यांचे वर्तन बालिश आहे. येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर जनतेचा विश्वास आणि कोणाचा किती प्रभाव आहे, हे स्पष्ट होईल. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व बाजूला सारून राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेससोबत हातमिळवणी केली. केवळ मुख्यमंत्रीपदाच्या मोहापोटी त्यांनी स्वतःचं राजकीय भविष्य अंधकारमय करून टाकलं आहे, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.

आणखी वाचा

Raj Thackeray Uddhav Thackeray: राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंची मिठी; बाळा नांदगावकरांचा व्हिडीओ व्हायरल, स्टेजवर काय केलं?