Ganesh Naik on Eknath Shinde: राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका 15 जानेवारी रोजी पार पडल्या. या निवडणुकांपूर्वीच नवी मुंबईत गणेश नाईक (Ganesh Naik) विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) असा राजकीय ‘सामना’ रंगला होता. निवडणूक निकालानंतर हा वाद संपेल, असे वाटत असतानाच आता हा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करत आक्रमक विधान केले आहे.
Ganesh Naik on Eknath Shinde: “भाजपाने परवानगी दिली तर नामोनिशाण मिटवू”
“भाजपाने परवानगी दिली, तर यांचे नामोनिशाण संपवून टाकू. मी आज परत बोलतो आहे,” असा थेट इशारा देत गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंना डिवचले. मात्र, भाजप हा शिस्त पाळणारा पक्ष असल्याचे अधोरेखित करत, “पक्षाने आदेश दिला म्हणून आम्ही ते मान्य केले. मनाला पटले नसले तरीही कार्यकर्त्यांनी सहन केले. पक्ष नेतृत्वाचा निर्णय आम्ही मान्य केला,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
नाईक म्हणाले, “एके काळी मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली होती. ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात (MMR) महायुतीतील सर्व कार्यकर्त्यांना स्वतंत्रपणे लढू द्यावे. निवडणुकीनंतर ज्यांचे नगरसेवक जास्त निवडून येतील, त्यांना मित्र पक्षांनी पाठिंबा द्यावा आणि उर्वरित पदांची वाटणी करावी, असे माझे मत होते,” असे देखील त्यांनी सांगितले.
Ganesh Naik on Eknath Shinde: फडणवीसांशी चर्चा, मात्र निर्णय झाला नाही
या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचेही गणेश नाईक यांनी सांगितले. “मी ही बाब मुख्यमंत्र्यांना सांगितली होती. त्यांनी त्यावर होकार दिला नाही आणि नकारही दिला नाही. आम्हाला अपेक्षा होती की कार्यकर्त्यांना संधी मिळेल, मात्र काही ठिकाणी ती संधी मिळाली नाही,” असे नाईक म्हणाले.
Ganesh Naik on Eknath Shinde: “नवी मुंबईत 57 जागांची मागणी होती”
नवी मुंबईतील जागावाटपावर भाष्य करताना नाईक म्हणाले, “नवी मुंबईत शिवसेनेकडून 57 जागांची मागणी करण्यात आली होती. मात्र, आम्ही त्यांना 20 ते 22 जागा देण्यास तयार होतो. शेवटच्या दिवसापर्यंत चर्चा सुरू होत्या. अखेर त्यांनी एबी फॉर्म भरले आणि आम्हीही भरले. त्यानंतर जे झालं, ते चांगलंच झालं,” असा टोला त्यांनी लगावला. ते पुढे म्हणाले, “ठाण्यातील लोकांना अशी करामत करता आली नाही. ठाण्यात भाजपाच्या घोड्यांचे लगाम खेचले गेले. कल्याणमध्येही तसेच झाले. तरीही पक्षाला जे मान्य होते, ते आम्ही मान्य केले, ” असे देखील गणेश नाईक यांनी म्हटले आहे.
Ganesh Naik : “भाजपा शिस्तीचा पक्ष आहे”
“भाजपा हा शिस्तीचा पक्ष आहे. एकदा आदेश दिला की तिथे इतर काही येत नाही,” असे सांगत नाईक यांनी ठाणे, उल्हासनगर आणि कल्याण-डोंबिवलीतील भाजप कार्यकर्त्यांची परवड झाल्याचे स्पष्टपणे मांडले. “हे मी बोलणार नाही, तर कोण बोलणार? तरीही कार्यकर्त्यांनी पक्षशिस्त पाळली, हे कौतुकास्पद आहे,” असेही त्यांनी नमूद केले. नाईक यांनी पुन्हा एकदा आपली जुनी भूमिका अधोरेखित करत सांगितले की, “सगळ्या पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली असती, तर ज्यांचे नगरसेवक जास्त निवडून आले असते, त्यांना महापौर पदासह इतर प्रमुख पदे मिळाली असती. मात्र, हे पूर्णपणे माझे वैयक्तिक मत आहे.”
आणखी वाचा
