पालघर : राज्याचे वनमंत्री पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या इतिहासासंदर्भात वक्तव्य करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नामोल्लेख टाळला. काही जण पदासाठी तर काही जण लपण्यासाठी तर काही वाचण्यासाठी जातात, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता निशाणा साधला. पालघर येथे शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख व सध्याचे उबाठा उपनेते उदय बंधू पाटील यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, शिवसेना उबाठाचे राजन विचारे, नेते विनायक राऊत , माजी मंत्री मनीषा निमकर, उबाठाच्या उपनेत्या, ज्योती ठाकरेतसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Ganesh Naik : गणेश नाईक काय म्हणाले?
ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचा इतिहास सांगायचा झाला तर पहिले जिल्हाप्रमुख म.धा. जोशी, सतीश प्रधान, साबीर शेख त्याच्यानंतर मी आणि माझ्यानंतर आनंद दिघे होते. नंतर बरेच जण झाले. मी बऱ्याच जणांच्या नावांची मालिका सांगत नाही. राजन विचारे आलेत त्यांचा शाल घेऊन सत्कार करा, असं गणेश नाईक म्हणाले. ठाणे जिल्ह्याच्या शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जातो का? तो पूर्णपणे खरा सांगितला जात नाही, असा टोला राज्याचे वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी लगावला.
बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानं प्रेरित झालेली तरुण पिढी त्यावेळच्या सत्ताधीशांसोबत संघर्ष करत होती, असं गणेश नाईक म्हणाले. काही जण पदासाठी जातात, काही लपण्यासाठी तर काही वाचण्यासाठी जातात. राजन काही म्हणतो मी काही जण वाचण्याकरता जातात. विनायक राऊत माझी भाषा समजते का? मी सांगतो आमचे हात साफ आहेत, आमचं मन साफ आहे. मरणाची भीती वाटत नाही, ज्या लोकांना मरणाची भीती वाटत असते त्यांच्या जीवनात काही अर्थ नसतो, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. उदय बंधू पाटील यांनी कधी कोणाचा द्वेष केला नाही. राजकारण सकारात्मक केलं, असं गणेश नाईक म्हणाले.
