मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळातून शिवसेना (Shivsena) पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या नाराजीची चर्चा असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार गजानन किर्तीकर नाराज असल्याची आणि ते पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त झळकले होते. मात्र, याबाबत, स्वत: गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी भेट घेऊन आपली भूमिका मांडली. माध्यमांतील हे वृत्त निराधार आणि खोटं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच, यापुढे शिवसेना पक्ष राज्यात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार असल्याचंही त्यांनी सांंगितलं.
मी शिवसेना पक्ष सोडणार असल्याच्या बातम्यांमुळे मला आश्चर्याचा धक्का बसला, पक्ष सोडण्याची माझी कोणतीही इच्छा नसून हे वृत्त निराधार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समाधानाने मी काम करत आहे. शिवसेना शिंदे गट सोडून अन्य कोणत्याही पक्षात जाण्याचा इरादा नाही. एकनाथ शिंदे यांनी फोन करून विचारपूस केली, त्यांना मी वस्तुस्थिती सांगितली. शिंदे यांच्या व्यक्तिमत्त्वावर विश्वास असून शिवसेना महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे, आता पक्षाला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही किर्तीकर यांनी म्हटले.
आपल्याला कोणतीही ऑफर आलेली नाही, बातमी देणाऱ्यांना खोडसाळ म्हणणार नाही. मात्र, बातमी पाहून मला धक्का बसला. कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवणे महत्त्वाचे असल्याचे एकनाथ शिंदे यांना सांगितले. माजी खासदार म्हणून व्याधिग्रस्त आणि अन्यायग्रस्त लोकांची कामे करण्यासाठी संपर्क आवश्यक आहे. तातडीच्या कामांसाठी मुख्यमंत्री किंवा पक्षप्रमुखांशी संपर्क साधता आला पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी संपर्कातील अडचण दूर करण्यासाठी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. महिन्यातून किमान एक बैठक घेण्याची मागणी केली आहे. एनडीएचा घटक म्हणून काम करताना पक्षासाठीही वेळ द्यावा, अशी सूचना देखील त्यांनी केली.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना काँग्रेसधार्जिणी होत होती आणि मराठी बाणा हरवत होता, म्हणून पक्ष सोडल्याचे स्पष्टीकरण देखील गजानन किर्तीकर यांनी दिले.
शिवसेना शिंदे गटात नाराजी?
एकनाथ शिंदे यांच्याशी भेट होत नसल्याने गजानन कीर्तिकर नाराज असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. त्यातच, गजानन किर्तीकर हे पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात परतण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याशी भेट होत नाही, महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी वेळ मिळत नाही, अशी नाराजी किर्तीकर यांची असल्याचे वृत्त होते. मात्र, हे वृत्त निराधार असल्याचे गजानन किर्तीकर यांनी स्पष्ट केले. तसेच, याबाबत एकनाथ शिंदेंशी बोललो असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, गजानन किर्तीकर हे शिवसेना पक्षातील ज्येष्ठ नेते असून शिवसेना ठाकरे गटाचे मुंबईतील नेते अमोल किर्तीकर यांचे वडील आहेत.
