मुंबई : राज्यातील जवळपास सर्वच प्रमुख निवडणुका (Election) संपन्न झाल्या असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचेही निकाल लागले आहेत. त्यामुळे, आता पुढील 3 वर्षे सत्ताधाऱ्यांना काम करणे तर विरोधकांना कामासाठी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणे हेच महत्त्वाचे काम आहे. मात्र, निवडणुकानंतरही पक्षप्रवेश आणि पक्षांतर सुरूच असल्याचे दिसून येते. शिवसेनेचे (Shivsena) मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे व त्यांच्या समर्थकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. तसेच, संभाजीनगर जिल्ह्यातील उबाठाचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

Continues below advertisement

आम्ही डावे उजवे सगळे पाहिले आहे. मात्र, दिलदार मनाचा एकमेव नेता एकनाथ शिंदे आहेत. म्हणून आम्ही आज शिवसेना पक्षात प्रवेश करत आहोत, असे शंकर धोंडगे यांनी यावेळी म्हटले. तर, एकनाथ शिंदे पक्षप्रवेशावर बोलताना म्हटले की, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. त्यामध्ये आज शंकर धोंडगेदेखील आपल्यासोबत आले आहेत. आपण सर्वजण एका विश्वासाने आला आहात. कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहणारा नेता अशी आपण ओळख करुन दिली. या पक्षात कोणी मालक नाही, चालक नाही. जो काम करेल तो पुढे जाईल, शेवटी कार्यकर्ता हाच पक्षाचा पाठीचा कणा असतो. आपण सर्वजण योग्य पक्षात आला आहात, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी शंकर धोंडगेंचं पक्षात स्वागत केलं. 

योग्यवेळी शेतकरी कर्जमाफी

आम्ही शेतकरी सन्मान योजनेत शेतकऱ्यांना 6 हजार रुपये अनुदान देत आहोत. ऑक्टोबर नोव्हेंबरमधे झालेल्या अतिवृष्टीसाठी 32 हजार कोटी रुपयांचे वाटपही शेतकऱ्यांसाठी केलं. शेतकऱ्यांसाठी जितके करता येईल ते करू, लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीचं आम्ही दिलेलं आश्वासन. योग्यवेळी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेणार असून त्यासाठी कमिटी नेमण्यात आली आहे, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी यावेळी दिली. 

Continues below advertisement

निवडणुकीत शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष

मी दानशूर आणि धाडसी आहे. एकवेळ अशी होती त्यावेळी आपण धाडस दाखवलं, आता कर्तुत्व दाखवणं गरजेचं होतं. सध्या झालेल्या निवडणुकीत आपण क्रमांक 2 चा पक्ष ठरलो आहोत. महायुतीला लोकांनी भरभरून दिले. शेतकरी सुखी झाला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका देखील एकनाथ शिंदेंनी मांडली.

कर्जमाफीच्या दृष्टीने हालचाली गतीमान

राज्य सरकार कर्जमाफीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील सर्व बँकांना थकीत शेतकऱ्यांची माहिती राज्य सरकारच्या शिंदे समितीकडे पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. जून 2025 पर्यंत थकीत कर्जदार शेतकऱ्यांची माहिती नाशिक जिल्हा बँकेकडून देखील घेतली जात आहे. 74 हजार शेतकऱ्यांची माहिती राज्य सरकारच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून इतर शेतकऱ्यांची माहिती मिळवण्याची प्रक्रिया जिल्हा बँकेकडून सुरू आहे.

हेही वाचा

अजित पवार खमके होते, त्यांच्या निधनानंतर मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केलेल्या कृत्याची फडणवीसांनी जबाबदारी घावी: हर्षवर्धन सपकाळ