मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं विमान दुर्घटनेत निधन झालं. या घटनेनंतर ४ दिवसातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोअर कमिटीने चर्चा करून आणि मुख्यमंत्र्यांशी बैठक घेऊन सुनेत्रा पवारांना (Sunetra Pawar) उपमुख्यमंत्री केलं. काल(शनिवारी, ता ३१) रोजी सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडला, त्यानंतर आता अजित पवारांकडे (Ajit Pawar) असलेली खाती आता सुनेत्रा पवारांकडे (Sunetra Pawar) असणार आहेत. मात्र वित्त खातं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणार आहे अशी माहिती आहे.(Sunetra Pawar)
राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सत्तेमध्ये आहे, मात्र आता अजित पवारांच्या निधनानंतर या पक्षाकडे वित्त खाते नाही अशी वेळ पहिल्यांदाच आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे वित्तखाते न दिल्यामुळे राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडतील यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
तर एका वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्यानुसार दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार) नेत्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली तेव्हा अर्थ खातं आमच्याकडेच ठेवा. ते होणार नसेल तर महत्त्वाची अन्य दोन खाती आमच्या पक्षाला द्या अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर राज्याच्या राजकारणात अशीही चर्चा होती की सुनेत्रा पवार यांना वित्त खाते दिलं जाणार नाही पण चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडील महसूल खाते दिले जाईल आणि बावनकुळे यांच्याकडे वित्त खाते सोपवलं जाईल, पण सुनेत्रा पवार यांना उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ ही खाती दिली आहेत.
अर्थ खातं अन् राष्ट्रवादी
सत्तेमध्ये असताना कायमच राष्ट्रवादी काँग्रेस आणि वित्त विभाग यांचं समीकरण राहिलेलं आहे. १९९९ मध्ये काँग्रेससोबत आघाडी सरकार आले तेव्हा राष्ट्रवादीचे जयंत पाटील अर्थ मंत्री झाले. सलग १० वेळा त्यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर याच पक्षाचे दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, अजित पवार असे २०१४ पर्यंत काँग्रेससोबत सत्ता असताना वित्त मंत्री राहिले. २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे तीन पक्षांचे सरकार आले तेव्हाही अजित पवार यांच्या रुपाने वित्त खाते राष्ट्रवादीकडेच राहिले होते, आताही अजित पवारांकडेच अर्थ खाते होते, ते या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करण्याच्या तयारीत होते.
सुनेत्रा पवार यांना राज्य प्रशासन आणि वित्त विभागाचा सखोल अनुभव नसल्याने, मार्चच्या पहिल्या आठवड्यात सादर होणाऱ्या २०२६-२७ च्या राज्य अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर वित्त खाते त्यांच्या वाट्याला येणार नाही, अशी चर्चा सुरू होती. आता त्या चर्चेला दुजोरा मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
२०२२ मध्ये शिंदेसेना-भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर वित्त खाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आले. त्यांनी ९ मार्च २०२३ रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर जुलै २०२३ मध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आणि वित्त खाते त्यांच्या ताब्यात आले. अजित पवार यांनी २८ जून २०२४ रोजी अंतरिम अर्थसंकल्प, तर १० मार्च २०२५ रोजी पूर्ण अर्थसंकल्प मांडला.
अजित पवार यांच्याकडे वित्त आणि उत्पादन शुल्क ही दोन खाती
२०२४ मध्ये महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर अजित पवार यांच्याकडे वित्त आणि उत्पादन शुल्क ही दोन खाती कायम ठेवण्यात आली होती. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर क्रीडा व युवक कल्याण हे खातेही अजित पवार यांच्याकडे आले. मात्र, या सर्वांपैकी वित्त खाते वगळता उर्वरित खाती आता सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आली आहेत.
वित्त खात्याचा निर्णय अंतिम नाही
तर एका मराठी वृत्तसंस्थेने दिलेल्या खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अवघ्या २० दिवसांवर आल्याने तूर्तास वित्त खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सांभाळावे, असा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून मांडण्यात आला होता. याबाबत मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत समन्वयाने निर्णय घेण्यात आला. त्यामुळे तूर्तास अर्थसंकल्प फडणवीस यांनीच मांडावा आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर वित्त विभागाबाबत अंतिम निर्णय घ्यावा, असेही ठरले आहे.
