मुंबई: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूंकप होण्याची शक्यता वर्तवली जात असून शिवसेना ठाकरे पक्षाचे 7 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिल्यानंतर दोन्ही शिवसेना पक्षासह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपली भूमिका स्पष्ट करत या सर्व चर्चा फेटाळून लावल्या असून माझी उद्धव ठाकरेंच्या (Shivsena UBT)पक्षातील कोणत्याही खासदारासोबत बैठक झाली नसल्याचं सांगितलं आहे.
शिवसेनेच्या 'ऑपरेशन टायगर' (Operation Tiger) बाबत राजकीय वर्तुळात चर्चा समोर आल्यानंतर ठाण्यात याबाबत बैठक झाली असल्याचा दावा केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "उबाठाच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचे वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारे आहे. अशी कोणतीही बैठक झालेली नाही," असं शिंदे यांनी सांगितलं आहे. तर, "उबाठाचे खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याच्या बातम्या गेल्या एक-दीड वर्षांपासून पसरवल्या जात आहेत. परंतु, या बातम्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. ती केवळ अफवा असून सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीच्या बातम्या देणे माध्यमांनी टाळले पाहिजे," असंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.
Eknath Shinde : बातम्या गेल्या एक-दीड वर्षांपासून पसरवल्या जात आहेत
एकनाथ शिंदे म्हणाले की, उबाठाच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचे वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारे आहे. अशी कोणतीही बैठक झालेली नाही. उबाठाचे खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याच्या बातम्या गेल्या एक-दीड वर्षांपासून पसरवल्या जात आहेत. परंतु, त्यात कोणतेही तथ्य नाही. ती केवळ अफवा आहे. त्यामुळे सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीच्या बातम्या देणे माध्यमांनी टाळले पाहिजे.
Operation Tiger : नेमकं प्रकरण काय?
बुधवारी रात्री 'ऑपरेशन टायगर'च्या (Operation Tiger) अनुषंगाने ठाण्यात एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या खासदारांची गुप्त बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत (Shivsena) मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे. तसेच येत्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे हे 'ऑपरेशन टायगर' यशस्वी करुन महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप करणार का, ही चर्चा पुन्हा रंगली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या खासदारांना मातोश्रीवर बोलावून त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी ठाकरे गटाच्या सर्व खासदारांनी आपण पक्षाशी इमानदार राहू, अशा शब्द उद्धव ठाकरे यांना दिला होता. मात्र, आता या नव्या भेटीने 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना पुन्हा उधाण येण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics News)
सूत्रांच्या माहितीनुसार, बुधवारी रात्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या आठ खासदारांची ही बैठक पार पडल्याचे वृत्त आहे. बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी अचानक त्यांचा ताफा सोडून वेगळ्या मार्गाने गेली. त्यानंतर ठाण्यातील व्होल्टास कंपनीच्या परिसरात एकनाथ शिंदे हे ठाकरे गटाच्या खासदारांना भेटल्याचे वृत्त आहे. बुधवारी रात्री उशीरा सुरु झालेली ही बैठक पहाटेपर्यंत सुरु होती, अशी माहिती आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे यांच्यासोबत श्रीकांत शिंदे हेदेखील उपस्थित असल्याची माहिती आहे.
तर ठाकरे गटाकडून या बैठकीला खासदार अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते. तर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह दोन खासदार व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत या खासदारांना शिंदे गटात सहभागी होण्याची ऑफर दिली गेल्याची माहिती आहे. मात्र, ठाकरेंच्या खासदारांना संपर्क केल्यानंतर ओमराजे निंबाळकर आणि अरविंद सावंत दोघांनाही अशी कोणतीही बैठक झाल्याचे वृत्त फेटाळून लावले. अरविंद सावंत यांनी म्हटले की, मी काही झालं तरी शिंदे सोबत जाणार नाही. तर ओमराजे निंबाळकर यांनीही, 'मी दोन टर्मचा खासदार आहे. माझ्या दोन टर्मपासून हीच चर्चा सुरू आहे. चुकीच्या बातमीवर मी स्पष्टीकरण देणार नाही. अशी कुठली बैठक झाल्याचं मला माहिती नाही. बैठक झाली असेल तर फोटो द्यावेत, असे आव्हान ओमराजे निंबाळकर यांनी दिले.
